आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य नाट्यस्पर्धेला उद्यापासून सहकार सभागृहात प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य महोत्सवातील नगर केंद्रावरील स्पर्धेला शनिवारी (१५ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात दररोज सायंकाळी ७ वाजता एकूण १० नाटके सादर होतील.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध केंद्रावर एकूण २८८ नाटके सादर होणार आहेत. नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने या स्पर्धा घेण्यात येतात. मागील वर्षी नगर केंद्रावर १३ नाटके सादर झाली होती. यंदाही १३ संघांनी प्रवेशिका पाठवल्या होत्या. मात्र, कलाभूषण सांस्कृतिक मंडळ (नगर), नाट्यरंग (नगर) व सूर्यतेज (कोपरगाव) या संस्थांनी काही कारणास्तव नाटक सादर करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे दहाच नाटके सादर होणार आहेत.

स्पर्धेत सादर होणारी नाटके - १५ नोव्हेंबर - शेवंता जिती हाय (जिप्सी प्रतिष्ठान), १६ नोव्हेंबर - मारूतीचा कौल (जय बजरंग मंडळ), १८ नोव्हेंबर - मेकअप (कलायात्रिक), १९ नोव्हेंबर - देव, देश आणि धर्मासाठी (कर्णेज अकादमी), २० नोव्हेंबर - उदकशांत (नटेश्वर कला मंडळ), २१ नोव्हेंबर - शापित - (रंगकर्मी प्रतिष्ठान), २२ नोव्हेंबर - मन वैशाखी डोळे श्रावण (सप्तरंग थिएटर्स), २३ नोव्हेंबर - राजहंसाचे गाणे (ढोकेश्वर कॉलेज), २४ नोव्हेंबर - यातून सुटका नाही (थिएटर ग्रूप), २५ नोव्हेंबर - स्मशानयोगी (वात्सल्य प्रतिष्ठान). प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या यातील एका नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येईल. यंदा समन्वयक म्हणून श्रेया देशमुख व सहसमन्वयक म्हणून राम देशमुख काम पहात आहेत.

पुन्हा पुन्हा शेवंता
"शेवंता जिती हाय' हे प्रल्हाद जाधव यांनी लिहिलेले नाटक मागील वीस वर्षांपासून राज्य नाट्य स्पर्धेतील कुठल्या ना कुठल्या केंद्रावर सादर होते. नगर येथील प्राथमिक फेरीमध्येही ते अनेकदा सादर झाले आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद व पारितोषिके पाहून दरवर्षी हे नाटक सादर करण्याचा मोह रंगकर्मींना आवरत नाही. यंदा शशिकांत नजान यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.