आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील राज्य नाट्यस्पर्धा नव्या अद्ययावत नाट्यगृहात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मामातोरडमल, सदाशिव अमरापूरकर, मिलिंद शिंदे या नाट्यकर्मींनी नगरचे नाव बॉलीवूडपर्यंत नेले. नगरच्या मातीतील कला जिवंत ठेवण्यासाठी अद्ययावत नाट्यगृह आवश्यक आहे. नगरकरांना त्याची आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. पुढील वर्षापर्यंत शहरात अद्ययावत नाट्यगृह उभारून त्याला सदाशिव अमरापूरकर यांचे नाव दिले जाईल, असे आश्वासन महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनी दिले.

५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शनिवारी सायंकाळी प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. ज्येष्ठ रंगकर्मी बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेचे उद््घाटन झाले. या वेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहसंचालक अनिता तळेकर, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य सतीश लोटके, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी, सुनील जगताप, समन्वयक श्रिया कुलकर्णी आदी मान्यवर रंगकर्मी उपस्थित होते.

नगर ही नाट्यकलावंतांची खाण आहे. या मातीतील कलावंतांना व्यासपीठ मिळाल्यास ते काय करु शकतात, हे आपल्या पूर्वसुरींनी दाखवून दिले आहे. नगरमध्ये अद्ययावत नाट्यगृह नसल्यामुळे येथील कलाकारांची कुचंबणा होते. पण आता नाट्यगृहासाठी नगरकरांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. शहरात अद्ययावत नाट्यगृह उभे रहावे, यासाठी सदाशिव अमरापूरकर यांनी नेटाने प्रयत्न केले. एक वर्षात नाट्यगृह उभारुन त्यांची इच्छा पूर्ण करू. पुढील वर्षीची स्पर्धा तेथे घेण्यासाठीच प्रयत्न राहील. या नाट्यगृहाला अमरापूरकर यांचेच नाव देऊन त्यांच्या स्मृती जपू, अशी ग्वाही आमदार जगताप यांनी या वेळी दिली.

उद््घाटनानंतर प्रल्हाद जाधव लिखित शशिकांत नजान दिग्दर्शित "शेवंता जिती हाय' हे नाटक सादर झाले. मंगळवारी (१८ नोव्हेंबर) स्नेहा रानडे लिखित कलायात्रिक नाट्यसंस्थेचे मेकअप सादर होईल.

५४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शनिवारी प्रारंभ झाला. उद््घाटनाच्या वेळी आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब चव्हाण, नाट्यकर्मी पदाधिकारी उपस्थित होते.