आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Nitin Raut Comment On Police For Newase Murder Case

खर्‍या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न : मंत्री राऊत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नेवासे तालुक्यातील सोनईजवळील तिहेरी हत्याकांड केवळ पाचजणांकडून होऊ शकत नाही. या गुन्ह्यात 10-15 जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करून यातील खर्‍या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रोजगार हमी योजना व जलसंधारण राज्यमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी केला.

मृतांच्या नातेवाईकांची भेट व घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शासकीय विर्शामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यावेळी उपस्थित होते. सुनियोजित कट करून अनुसूचित जातीच्या तीन युवकांचे तुकडे करण्यात आल्याच्या या घटनेने खैरलांजी प्रकरणाची आठवण करून दिली. सेप्टीक टँक, मृतदेहाचे तुकडे टाकण्यात आलेली बोअरवेल व दोन मृतदेह पुरलेली विहीर यात असणारे 500 मीटरचे अंतर पाहता विचारपूर्वक कट करून संबंधितांना मारण्यात आल्याचे स्पष्ट होते. सेप्टीक टँकची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने या तरुणांना सोनईत बोलावणार्‍यांचा कटामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. मृतांची शरीरयष्टी पाहता, तसेच मृतदेहाचे तुकडे करण्याचा प्रकार लक्षात घेता हे कृत्य केवळ पाचजणांचे नाही. सुडाच्या भावनेतून हे निर्घृण खून करण्यात आले. किमान 10 ते 15 आरोपी यात सामील असल्याचे सकृतदर्शनी दिसते. इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. गुन्ह्याचे मूळ कारण लपवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. मूळ कारण पुढे आल्याशिवाय खर्‍या सूत्रधारांना अटक होणार नाही. घटनेनंतर पाच दिवसांनी अँट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले, असे राऊत यांनी सांगितले.

तपास सीआयडीकडे द्या
तिहेरी हत्याकांडातील आरोपी एका विशिष्ट समाजाचे आहेत. त्यांच्या राजकीय व आर्थिक दबावाला बळी पडून पोलिस आरोपींना पाठीशी घालत आहेत. अटक केल्याचा देखावा करून पुरावे नष्ट करण्याची संधी दिली जात असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी मेहतर समाजाच्या वतीने मंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी; अन्यथा आठवडाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिला.

मंत्र्यांची विसंगत भूमिका
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला तपास संशयास्पद असल्याचे सांगत राऊत यांनी पोलिसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र, शेवटी तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे ते म्हणाले. संगनमत करून गुन्हा केल्याचे कलम पोलिसांनी लावलेच नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, र्शीरामपूर विभागाच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे यांनी 5 जानेवारीलाच हे कलम लावण्यात आल्याची माहिती त्यांना दिली. अधिकार्‍यांकडून माहिती न घेताच एका गंभीर प्रकरणात जबाबदार मंत्री पोलिसांवर आरोप करतात याची चर्चा सुरू होती.