आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेसिडेंट फुटबॉल चषक पुण्याच्या बीईजीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कँटोन्मेंट बोर्ड व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रेसिडेंट चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पुण्याच्या बीईजीने पटकावले. किल्ला मैदानावर नऊ दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचा अंतिम सामना बॉम्बे इंजिनियरिंग ग्रूप (बीईजी, पुणे) व एसएसएसआई (सोलापूर) यांच्यात झाला. पुण्याच्या संघातील जगप्रितसिंह याने चढाई करत पहिल्या दहा मिनिटांत पहिला गोल केला.
सामन्याच्या मध्यंतरापर्यंत त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत दुसरा गोल केला. उत्तरार्धात सोलापूरच्या संघाला गोल करण्याची संधी मिळाली, परंतु त्यांना यश आले नाही. सामन्याच्या शेवटच्या क्षणी जगजितने तिसरा गोल करून पुण्याच्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. विजयी संघास २१ हजार रुपये व चषक देण्यात आला. उपविजयी संघास पंधरा हजारांचे बक्षीस व चषक ऑन ब्रिगेडिअर जी. एस. संघेरा यांच्या हस्ते देण्यात आला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुण्याच्या संघातील सूरजराय, चत्तर चौधरी व जगप्रितसिंह यांना नगर क्लबचे उपाध्यक्ष किरण बोरा यांच्या हस्ते गौरवण्यात आले. पंच म्हणून रमेश परदेशी, संजय इस्सर, जावेद इराणी, भूपेंद्र सिंह, मनीष राठोड, उमर शेख यांनी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन गॉडवीन डिक, गणेश भोर, अरविंद कुडिया, शांतीकुमार शिरकुल, रमेश साके, सोनवणे, फुलसौंदर यांनी केले. यावेळी कँटोन्मेंट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, जिल्हा फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी लॉरेन्स स्वामी, राणासेठ परमार, जोगासिंहजी मिनाहास, मनोज वाळवेकर, गोपाळराव झोडगे आदी उपस्थित होते.