आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Revenue Minister Balasaheb Thorat's Meet At Ahmednagar

सातबारा अद्ययावत करण्यास गती द्या; बाळासाहेब थोरात यांच्या सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सातबारा व अनुषंगिक इतर नमुने अद्ययावत करण्याच्या कामाला अधिक गती द्यावी तसेच जानेवारी 2014 अखेर हे काम पूर्ण करावे, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (24 डिसेंबर) दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या सुवर्णजयंती राजस्व अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, महसूलचे उपजिल्हाधिकारी डी. एस. बोरुडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी गोरक्ष गाडिलकर आदी उपस्थित होते. ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध होण्यासाठी त्यातील त्रुटी दूर करून संगणकीकृत सातबारा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. या कामाला गती देऊन जानेवारी 2014 अखेर ते पूर्ण करावे. त्यामुळे राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम यशस्वी होईल, असेही थोरात यांनी या वेळी सांगितले.
सुवर्णजयंती राजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेताना थोरात म्हणाले, या अभियानात जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला पाहिजे. त्यादृष्टीने महसूल अधिकार्‍यांनी प्रयत्नशील राहावे.
जिल्ह्याचा स्वत: दौरा करून या अभियानांतर्गत झालेल्या कामाची तालुकानिहाय प्रत्यक्ष पाहणी व आढावा 15 ते 20 जानेवारीदरम्यान घेतला जाईल. या वेळी अभय ललवाणी यांनी तयार केलेल्या महसूलमित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन मंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीला ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, र्शीरामपूरचे प्रकाश थविल, संगमनेरचे संदीप निचित, कर्जतचे संदीप कोकडे, शिर्डीचे अजय मोरे, र्शीगोंदा-पारनेरचे संतोष भोर, पाथर्डीच्या ज्योती कावरे, तहसीलदार शर्मिला भोसले, तहसीलदार विजयकुमार ढगे तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते.
राजस्व अभियानाच्या विविध कामांचा घेतला आढावा
राजस्व अभियानांतर्गत चावडी वाचन, विविध दाखल्यांचे वाटप, अतिक्रमणमुक्त केलेले रस्ते, फेरफार नोंदी, संगणकीकृत सातबारा, आदिवासी जमिनीच्या आरक्षणासाठी विशेष मोहीम, संगणकीकृत अधिकार अभिलेखाचे अद्ययावतीकरण या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती या वेळी दिली. नगरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील व र्शीरामपूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश थाविल यांनी सादरीकरणातून महसूल उपविभागात झालेल्या कामांची माहिती दिली.