आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Station Rod Flyover Bridge Decision On 17 October Nagar

उड्डाणपुलासंदर्भात 17 ऑक्टोबरला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाबाबत प्रधान जिल्हा न्यायाधीश ज. द. कुळकर्णी यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाला असून गुरुवारी (17 ऑक्टोबर) निर्णय होणार आहे.

उड्डाणपुलाचे काम दहा दिवसांत सुरू करा; अन्यथा निविदा कलमानुसार कारवाई करू, अशी निर्वाणीची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार चेतक एंटरप्रायजेसला 30 सप्टेंबरला बजावली होती. या नोटिशीला ठेकेदाराने जिल्हा न्यायालयात आव्हान देत मनाई हुकूम देण्याची मागणी केली. लवाद मंडळाची स्थापना अंतिम टप्प्यात असून लवादाचा निर्णय होईपर्यंत करार रद्द करू नये, अशी मागणी ठेकेदारातर्फे करण्यात आली. निविदेनुसार पुलाच्या कामासाठी प्रस्तावित करण्यात आलेली रक्कम भूसंपादन व सेवावाहिन्या हस्तांतरित करण्यासाठी खर्च होत आहे.भूसंपादनाला झालेला विलंब, सेवावाहिन्या हस्तांतरित करण्यासाठी न मिळालेली तांत्रिक मान्यता, महापालिका प्रशासनाचे असहकार्य आदींमुळे कामास विलंब झाला आहे.

बांधकाम खर्चात झालेली वाढ गृहीत धरून 75 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला मान्यता देण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे. 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ 15 टक्क्यांच्या कामासाठी पूर्ण करार रद्द करणे अयोग्य असल्याचे म्हणणे ठेकेदारातर्फे अँड. के. एम. देशपांडे व दिल्लीचे विधिज्ज्ञ जगत आनंद व टी. कौसर यांनी मांडले, तर बांधकाम विभागातर्फे अँड. विवेक म्हसे यांनी बाजू मांडली. नियमानुसार कामासाठी वाढीव खर्च मंजूर केला आहे. ठेकेदाराला कामाऐवजी पैशात अधिक रस आहे. पुलाच्या कामासाठी आंदोलनेही झाली आहेत. त्यामुळे मनाई हुकूम देऊ नये, अशी मागणी बांधकाम विभागाकडून करण्यात आली.