आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2,475 उमेदवारांची विक्रीकर परीक्षेस दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) वतीने रविवारी (22 डिसेंबर) नगर शहरातील 26 केंद्रांवर विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा घेण्यात आली. सात हजार 429 उमेदवारांनी ही परीक्षा दिली, मात्र 2 हजार 475 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अहमदनगर महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय, रेसिडेन्शियल विद्यालय, पंडित नेहरू विद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, चाँद सुलताना हायस्कूल, सीताराम सारडा विद्यालय, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल, सावेडीतील रेणावीकर विद्या मंदिर, पद्र्मशी डॉ. विठ्ठलराव विखे इंजिनिअरिंग महाविद्यालय (विळद), आनंद माध्यमिक विद्यालय, सर्मथ विद्यामंदिर यासह 26 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेचा कालावधी एक तास होता. या परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जिल्हा प्रशासनाला 10 हजार 32 उमेदवारांची बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते.

एकूण 9 हजार 904 उमेदवार ही परीक्षा देणार होते. 7 हजार 429 उमेदवार परीक्षेसाठी हजर होते. 2 हजार 475 उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. या परीक्षेसाठी समन्वयक अधिकारी म्हणून चार उपजिल्हाधिकारी, भरारी पथक अधिकारी, 26 उपकेंद्रप्रमुख, 26 सहायक, 100 पर्यवेक्षक सहायक, 418 समवेक्षक, 26 लिपिक, 26 शिपाई, 100 पाणीवाटप कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, नगर शहरासह नेवासे, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, कोपरगाव येथील परीक्षार्थ्यांसोबत त्यांचे पालक आल्याने परीक्षा केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती.

वेळ कमी पडला..
प्रश्नपत्रिका सोपी होती. मात्र, वेळ कमी पडला. अकरा वाजता पेपर सुरू झाला. बारा वाजेपर्यंत पेपर घेण्यात आला. पेपर सोडवण्यासाठी आणखी थोडा वेळ देणे गरजेचे होते. ’’ मोनिका भुजबळ, उमेदवार

पर्याय चुकीचा दिला
प्रश्नपत्रिकेतील पान क्रमांक 12 वरील प्रश्न क्रमांक 29 मध्ये चुकीचा पर्याय देण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला. प्रश्नपत्रिकेत 4 ने पूर्ण भाग जाणार्‍या तीन अंकी संख्या किती आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. पर्याय (1) 220, (2) 224, (3) 225 व (4) 228 हे देण्यात आले होते. यातील पर्याय क्रमांक चार चुकीचा होता.’’ मिलिंद तांगडे, उमेदवार

परीक्षेत गैरप्रकार नाही
शहरातील 26 केंद्रांवर विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली. सर्व केंद्रांवर परीक्षा शांतेत पार पडली. कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार घडलेला नाही. परीक्षेपासून उमेदवार वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने पुरेपूर काळजी घेतली.’’ डॉ. सदानंद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी