आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्य दिन विशेष: पारतंत्र्यात आम्ही जिंकलो, पण स्वातंत्र्यात हरलो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘‘राज्यपाल साहेब, माझ्या पत्राची आपण स्वत: दखल घेतली. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जिल्हा प्रशासन मात्र गेली 20 वर्षे दखल घेत नाही, हे माझ्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकाचे दुर्दैव आहे. आता यापुढे माझ्या पाल्याच्या नोकरीसंदर्भात मी कोणाकडेही अर्ज करणार नाही. आम्ही देशाच्या स्वातंत्र्याची लढाई मोठय़ा आनंदात जिंकलो. पण, मुलाच्या नोकरीसाठी केलेली वीस वर्षांची लढाई तुमच्या प्रशासनापुढे मात्र हरलो. जय हिंद!’’

ही खंत आहे एका स्वातंत्र्यसैनिकाची. एकीकडे स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना देशासाठी आपले तारुण्य खर्ची घालणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचे हे प्रातिनिधिक उद्गार लालफितीच्या कारभारावर प्रकाश टाकणारे आहेत. नेवासे तालुक्यातील घोडेगावच्या गंगाधर बापूराव जाधव (वय 86) यांची ही कैफियत. शाळेत असताना राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते किसन भानुदास जपे यांचे स्फुल्लिंग चेतवणारे भाषण ऐकून त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिले. शालेय शिक्षण संपताच गावातील मित्र सीताराम बर्‍हाटे यांच्यासमवेत घोडेगावात राष्ट्र सेवा दलाची शाखा उघडली. देशभक्तीचा प्रचार करत गावात प्रभातफेरी व मोर्चे काढणे, ग्रामस्थांना काँग्रेस कार्याचे महत्त्व सांगणे, हा त्यांचा नित्यक्रम बनला.

घोडेगावातल्या त्यावेळच्या तलाठय़ाने वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जाधव यांची कागाळी केली. चिडलेल्या जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी तलाठी कार्यालयातील दफ्तर पेटवले. त्यामुळे सरकारने त्यांच्याविरुद्ध अटकेचे वॉरंट काढले. मग जाधव यांनी भूमिगत होऊन आपला लढा सुरूच ठेवला. सोनईत झालेल्या साने गुरुजींच्या शिबिराला ते उपस्थित राहिले. सातार्‍याचे क्रांतिसिंह नाना पाटील, नगरचे रावसाहेब पटवर्धन, दत्ता देशमुख, बाळासाहेब भारदे यांच्या सभांचे आयोजन त्यांनी घोडेगावात केले.

1968 मध्ये माजी खासदार उत्तमचंद बोगावत यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या कल्याणासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते जाधव यांना सन्मानपत्र मिळाले. 1983 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दीडशे रुपये मानधन सुरू केले. नंतर शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्या काळात ते आठ हजारांवर आले. पण, जाधव यांच्या कुटुंबाची परवड संपली नाही. पुढे शासनाने स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे जाधव यांनी 1993 मध्ये मोठा मुलगा राजेंद्र याचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवले. तेव्हापासून मुलाला नोकरी मिळावी, याकरिता तब्बल 20 वर्षे जाधव यांनी शासन दरबारी उंबरठे झिजवले.

वीस वर्षांत राजेंद्रने जिल्हा रुग्णालयात दोन वेळा, जिल्हा परिषदेत चार वेळा विविध पदांसाठी अर्ज केले, लेखी परीक्षाही दिल्या. पण, कधी मेरिटमध्ये नाव नसल्याचे, तर कधी थातूरमातूर कारण सांगून प्रशासनाने राजेंद्रला नोकरी नाकारली. दरम्यानच्या काळात, गंगाधर जाधव यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, राज्यपालांशी पत्रव्यवहार केला. राज्यपालांनी जाधव यांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांकडे विचारणा केली. त्यावर 17 जून 2013 रोजी प्रशासनाकडून जाधव यांना ‘तुम्हाला नोकरी मिळणार नाही’ असे पत्र आले. स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा राजेंद्र आता गावात पानटपरी चालवतो.
हे आहे प्रशासकीय उत्तर

‘स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्याने नोकरीसाठी वेळोवेळी विविध शासकीय कार्यालयांच्या जाहिराती पाहून तेथे अर्ज करावा. सामान्य प्रशासन विभाग केवळ स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचे नामनिर्देशन स्वीकारते. या विभागाकडून नोकरी दिली जात नाही. सबब आपला अर्ज निकाली काढला आहे’, असे ठरावीक सरकारी छापाचे उत्तर गंगाधर जाधव यांना मिळाले. त्यांचे पाल्य राजेंद्र हे आता 42 वर्षांचे आहेत. शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत त्यांची वयोर्मयादा संपली. त्यामुळे प्रशासनापुढे हतबल होत अखेर हार पत्करून जाधव यांनी राज्यपालांना धन्यवादाचे पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे.
या सत्तेत जीव रमत नाही

4देशातील पुढारी स्वत:चे पगार वाढवण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येतात. पण, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय कोणत्या परिस्थितीत जगतात, याचे कोणालाच सोयरसूतक नाही. पुढार्‍यांच्या वाढदिवसाला गावभर शुभेच्छाफलक झळकतात. आमच्या वाट्याला मात्र गुलाबाचे फूलही येत नाही. प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण प्रशासन दरवर्षी देते. एरव्ही ते पत्र पाहून गर्वाने छाती फुलायची. आता त्या कागदाचा अभिमानही वाटत नाही.’’ गंगाधर जाधव, घोडेगाव
;;;;;;;;;;;;;;;;;;
उड्डाणपुलाबाबत 21 ला मुंबईत बैठक
प्रतिनिधी । नगर
स्टेशन रोडवरील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत 21 ऑगस्टला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, हे काम तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गुरुवारपासून साखळी उपोषण सुरू करणार आहे. या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी पाचपुते यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन बैठकीची घोषणा केली.

नगर-शिरुर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा भाग असलेल्या उड्डाणपुलासाठी नगरकरांना गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. मूळ निविदेत समावेश असलेल्या या पुलाचे काम विविध कारणांनी लांबले आहे. भूसंपादनाचा प्रo्न मार्गी लागून वर्ष उलटून गेले. नंतर बांधकामाचा खर्च वाढल्याचे कारण पुढे करत चेतक एंटरप्रायजेस या ठेकेदाराने वाढीव खर्च दिला तरच काम सुरु करू असा पवित्रा घेतला. सुरुवातीला साडेबारा कोटी रुपये खर्च असलेल्या पुलासाठी ठेकेदाराने 75 कोटी खर्च दाखवला. निविदेनुसार अडीच वर्षांपूर्वीच हा पूल व्हायला हवा होता.

हे काम तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी आमदार राठोड यांनी आंदोलनाचा इशारा देताच पाचपुते यांनी बुधवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक घेऊन पालकमंत्री मधुकर पिचड व सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळ यांच्याशी संपर्क साधला. 21 ऑगस्टला मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर भुजबळ यांच्या दालनात पुलाच्या कामाबाबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. अधिकार्‍यांनी पुलाच्या वाढीव खर्चाचा 20 कोटी 75 लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. ठेकेदाराकडूनही प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
सर्वपक्षीय समितीला उशिरा आली जाग
अडीच महिन्यांपूर्वी भुजबळ यांच्या दालनात उड्डाणपुलासंदर्भात बैठक होऊन ठेकेदाराला आठ दिवसांच्या आत निर्णय कळवण्याचे आदेश देण्यात आले होते. राठोड यांनी आंदोलनाचा इशारा देताच सर्वपक्षीय समिती खडबडून जागी झाली. अडीच महिन्यांनंतर पुन्हा बैठकीचाच सूर आळवण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गाडे व पंचायत समिती सदस्य संदेश कार्ले यांची उपस्थिती हीच पाचपुते यांच्यासाठी जमेची बाजू ठरली.