आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणकीकरणामुळे शेअर बाजार पारदर्शक- चंद्रशेखर ठाकूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेअर बाजार हा अतिशय गुंतागुंतीचा विषय असून त्यामध्ये फसवणूक होते, असा गैरसमज पसरला आहे. परंतु तो चुकीचा असून उलटपक्षी संगणकीकरण झाल्यामुळे शेअर बाजारात पारदर्शकता वाढली आहे, असे प्रतिपादन सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडियाच्या (सीसीडीएल) गुंतवणूकदार शिक्षण विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांनी गुरुवारी येथे केले.
दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित ‘शेअर बाजाराविषयी समज-गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. हे व्याख्यान इंडियन मेडिकल असोसिशनच्या कल्याण रोडवरील आयएमए भवनात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्णिमा शिरीषकर यांनी केले. यावेळी ठाकूर यांनी अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत आणि हसत-खेळत शेअर बाजाराची माहिती, त्यातील कायदे, गुंतवणुकीचे प्रकार, याविषयी माहिती दिली.

ठाकूर म्हणाले, शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी डी-मॅट खाते उघडावे लागते. शेअर बाजारात गतिमानता आणण्यासाठी ‘डी-मॅट’ खात्याची पद्धत वरदान ठरली आहे. हल्ली शेअर्स प्रमाणपत्र हस्तांतरण व्हायला अवघे काही सेकंद लागतात. म्हणून अलीकडे बाजार चांगलाच वाढला आहे. नगरमधील सहकारी बँकांमध्येही आता डी-मॅट खात्याची सुविधा उपलब्ध आहे. सोन्यातील गुंतवणूक म्हणजे मृत गुंतवणूक आहे. कारण, त्यापैकी 10 टक्के गुंतवणूक जरी शेअर बाजारात केली, तरी शेअर बाजाराचे चित्र बदलेल.
शेअर बाजारातील गुंतवणुकीसंबंधी काही समज-गैरसमज आहेत. शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक नसतात, असाही एक गैरसमज आहे. उलट शेअर बाजारातील सर्व व्यवहार अतिशय पारदर्शकपणे होत आहेत. फक्त एकाच वेळी 15 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करू नयेत. शेअर बाजारात बहुतांश वेळा फसवणुकीचे व्यवहार होतात, असा आणखी एक गैरसमज आहे. परंतु, तसे काहीही नाही. ज्यांना शेअर बाजारातील व्यवहार कळत नाहीत, त्यांना कोणीही फसवू शकतो. त्यामुळे शेअर बाजाराला मात्र विनाकारण बदनाम करण्यात येत आहे.
गुंतवणूक करताना कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, याचा ढोबळ अभ्यास करायलाच हवा. साधारणपणे आपल्याला माहीत असलेल्या काही कंपन्या असतात. जेव्हा शेअर बाजार ढासळलेला असतो, त्यावेळी बाजारात गुंतवणूक करणे केव्हाही चांगले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित महिला व पुरुषांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. यावेळी ‘दिव्य मराठी’चे ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे हेही उपस्थित होते. दरम्यान, या व्याख्यानामुळे सर्वसामान्य नागरिक व गुंतवणूकदार यांना शेअर बाजाराविषयी संपूर्ण माहिती मिळण्यास मदत झाली.
तर बाजाराचे चित्र बदलेल
भारतात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण अधिक आहे. सरकारही त्यामध्ये मागे नाही. सरकारने गेल्या वर्षी 29 हजार 238 कोटी खर्च करून परदेशातून सुमारे 1 हजार 92 टन एवढे सोने आयात केले. ते आता तिजोरीमध्ये ठेवले आहे. मुळात सोन्यातील गुंतवणूक ही मृत गुंतवणूक आहे. त्यामध्ये फारसा नफा होत नाही. त्यापैकी किमान 10 टक्के गुंतवणूक शेअर बाजारात केली, तरी शेअर बाजाराचे चित्र मोठ्या स्वरूपात बदलेल, असेही चंद्रशेखर ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
अशी करावी गुंतवणूक
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासंबंधी काय भूमिका असायला हवी, याबाबत पूर्णिमा शिरीषकर यांनी मार्गदर्शन केले. शेअर बाजारात प्रवेश, बाहेर कधी पडायचे आणि नफा कसा कमवायचा, हे ज्याला कळाले, त्याला बाजार कळाला. त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करणे अतिशय सोपे आहे. शक्यतो जो कोणी शेअर बाजारात नव्यानेच पाऊल टाकत असेल, त्याने आपल्या व्यवहाराची सुरुवात शंभर रुपयांपासून करावी. म्हणजे फारसे नुकसान होत नाही. शिवाय बाजारातील व्यवहारज्ञान अवगत होते, असे त्या म्हणाल्या.