आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मदहनाचा इशारा देताच स्टोनक्रशर चालकाला नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जामखेड तालुक्यातील अवैध खडीक्रशर चालकाविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तथापि, अधिकार्‍यांनी संबंधिताला नोटीस बजावण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
गोयकरवाडी व खरातवाडी परिसरातील अवैध खडीक्रशर व खाणचालकांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. जामखेडचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी वेळीच हस्तक्षेप करून आत्मदहन करण्यास विरोध केला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी शेतकर्‍यांबरोबर पोलिस कॉन्स्टेबल सोमवारी नगरला आले. आत्मदहनाचा प्रकार घडू नये, यासाठी तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय गोगावले यांनी बंदोबस्त तैनात केला.
शेतकर्‍यांनी उपप्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. खडीक्रशरमुळे परिसरातील शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. दहा-बारा शेतकर्‍यांच्या फळबागा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात वेळोवेळी मागणी करूनही संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.
नाशिक येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकार्‍यांनी संबंधित खडीक्रशरचालकाला नोटीस बजावल्याचे खेडकर यांनी सांगितले. कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

आमदार राम शिंदे संतप्त
अवैध खडीक्रशर व खाणप्रकरणी उन्हाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. त्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारवाई केल्याचे उत्तर दिले होते. कारवाई केली होती, तर खडीक्रशर कसे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित करून आमदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.