आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगांचा स्पर्श होताच रस्त्यावरील दगडालाही लाभले सौंदर्य...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कलावंतांकडे असणारी कल्पक दृष्टी अन् रंगांचा स्पर्श झाला, तर रस्त्यावर पडलेल्या एखाद्या दगडालाही सौंदर्य मिळते. नुसते सौंदर्यच मिळत नाही, तर त्या दगडाचे एखाद्या सुंदर कलाकृतीत रूपांतर होते. नंतर हाच दगड तुमच्या घरातील ‘शो-पीस’ ठरू शकतो. याचा प्रत्यय ‘कलाजगत’च्या उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आला.

गुलामोहोर रस्त्यावरील ज्येष्ठ शिल्पकार व चित्रकार प्रमोद कांबळे आर्ट गॅलरीमध्ये सध्या ‘कलाजगत’चे उन्हाळी शिबिर सुरू आहे. बुधवारी (28 मे) चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी शिबिरार्थींना ‘स्टोन पेंटिंग’ शिकवले. त्यासाठी प्रत्येक शिबिरार्थी वेगवेगळ्या आकाराचे दगड, रंग आणि ब्रश घेऊन आले होते. कोणाला दगडामध्ये कोणता आकार दिसतो, त्यावरून दगडाला विविध रंगांनी रंगवायचे, अशी ही कल्पना होती. त्यासाठी सर्वप्रथम कांबळे यांनी एक दगड रंगवून दाखवला. एका दगडाचे केवळ रंगामुळे कलाकृतीत रूपांतर झाल्याचे पाहून शिबिरार्थी हरखून गेले. यानंतर शिबिरार्थींना त्यांच्या पद्धतीने दगड रंगवायला सांगितले.
दगडावर ब्रशच्या साह्याने विविध रंगांचा स्पर्श होताच दगडाचे रूप पालटले. अन् त्याच दगडात कुणी पक्षी, पानं, फुलं, गणपती, व्यंगचित्र व चेहरे साकारले. या शिबिरात आपण एक चांगली कलाकृती करायला शिकलो, या आनंदाने सहभागी शिबिरार्थींचेही चेहरे फुलले. सर्वांच्या चेह-यावरील समाधान पाहून प्रमोद कांबळेही आनंदी झाले. गुरुवारी पुण्यातील प्रसिद्ध कलावंत रामकृष्ण कांबळे यांनी जलरंगातील व्यक्ती चित्रणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तर प्रमोद कांबळे यांनी पेन्सिल चित्राचे प्रात्यक्षिक सादर करून माहिती दिली.