आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगारमध्ये पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीला रविवारी दुपारी गालबोट लागले. मतदानासाठी ओळखपत्र मागितल्याच्या कारणावरून झालेला तणाव निवळण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्याचा राग आल्याने एका गटाने मतदान केंद्रावर दगडफेक केली. संशयित आरोपींना अटक करण्यासाठी आलमगीर परिसरात गेलेल्या पोलिसांच्या वाहनावरही जमावाने दगडफेक केली. त्यामुळे सायंकाळपर्यंत भिंगारमध्ये तणावाचे वातावरण होते.

नागरदेवळे येथील उपसरपंच सतेज ऊर्फ चिंटू आल्हाट याच्या खुनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रविवारी पोटनिवडणूक होती. एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सावतानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केंद्र होते. दुपारपर्यंत मतदान शांततेत सुरू होते. तीनच्या सुमारास एका मतदाराला ओळखपत्र विचारल्याच्या कारणावरून मतदान केंद्रातील कर्मचारी व मतदारांत किरकोळ वाद झाले.

बंदोबस्ताला असलेल्या पोलिस अधिकार्‍यांनी तणाव निर्माण होऊ नये म्हणून सौम्य लाठीमार केला. थोड्या वेळाने मतदान केंद्रावर आलेल्या जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने आणखी कुमक मागवली. या घटनेची माहिती समजताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी किरकोळ लाठीमार केला. थोड्या वेळाने वातावरण शांत झाले. मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.

दरम्यान, दगडफेक करणार्‍या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक वाहन आलमगीर परिसरात आले. संशयितांना पकडून नेत असताना जमावाने पोलिसांचे वाहन अडवले. त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. त्यामुळे जमावाने पुन्हा पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. तेवढय़ात आणखी पोलिसांची कुमक आली. नंतर दगडफेक बंद झाली. या घटनेमुळे आलमगीर परिसर व मतदान केंद्रावर सायंकाळपर्यंत तणावाची परिस्थिती होती. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.