आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंग...तुम्हीच सांगा बरं राव, आँ! छोटा पुढारी घनश्यामच्या वाक‌्बाणांनी सगळेच अवाक्

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - वय वर्षे तेरा-चौदा, वामनमूर्ती. खेळण्या बागडण्याचे दिवस. मात्र श्रीगोंद्याचा घनश्याम दत्तात्रेय दरोडे (टाकळी लोणार) हा छोटा मल्लीनाथ आपल्या वाक् बाणांनी सरकारसह अनेकांना घायाळ करत आहे. त्याचे शाब्दिक पंच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बेधडकपणे आपले मत व्यक्त केल्यानंतर तो ‘तुम्हीच सांगा बरं राव, आँ’ असे विचारण्यासही विसरत नाही.

इयत्ता आठवीत शिकणारा घनश्याम गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील परिस्थितीवर जेव्हा तो बोलू लागतो तेव्हा त्याच्या शाब्दिक फटकाऱ्यांनी अनेक जण निरूत्तर होतात. वीज, पाणी, शेती, सहकार, बाजारभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळावर उपाय आदी अनेक प्रश्नांवर तो बेधडक बोलतो. विशेष म्हणजे त्याच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशी त्याची उदाहरणे परिपक्व असतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याच्या मुलाखती प्रसारित केल्याने छोटा घनश्याम रातोरात स्टार झाला.

बहिणीनंतर आई-वडिलांना घनश्याम हा एकुलता एक मुलगा. शेतकरी कुटुंबात तो वाढला. घरची परिस्थिती जेमतेम. काही दिवस तो घारगावच्या (ता. श्रीगोंदे) आश्रम शाळेत शिकत होता. पुढे तो मूळ गावी परतला. त्याची खरी ओळख झाली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान. माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या विरोधात त्याने राहुल जगताप (राष्ट्रवादी) यांचा प्रचार केला. त्याच्या भाषणांना टाळ्यांचा पाऊस पडत होता. पाचपुते पडले जगताप आमदार झाले. यातून घनश्यामचा आत्मविश्वास दुणावला. 'दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने त्याची भेट घेवून प्रतिक्रिया विचारली असता 'माझं महत्त्व आताशी पटलं का, असा प्रतिप्रश्न केला. शेतकऱ्यांचे जीवन किती खडतर आहे हे एकदा निर्णय घेणाऱ्या मंडळींनी शेतकऱ्यांसोबत काही दिवस राहून समजून घ्यावे, असा सल्ला देण्यास तो विसरला नाही. कांद्याचा दर ९० रुपयांवरून १० रुपयांवर घसरतो. दुधापेक्षा पाणी दुप्पट किमतीने विकले जाते, प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाचे दर ठरवतो; मात्र शेती मालाचे दर शेतकरी नाही तर ग्राहक ठरवतो हा अन्याय नाही का, असे शेती धंद्याचे अर्थशास्त्र तो बोबड्या भाषेत सांगत होता.

कलेक्टर होऊन व्यवस्था बदलायची आहे :
राज्य केंद्रात झालेल्या सत्तांतरातून देखील शेतकऱ्यांची समस्या कायम असल्याचे सांगत ही तर "जुन्या बाटलीत नवी दारू' असल्याची उपमा त्याने दिली. आपण कोणी राजकीय पुढारी किंवा नेते नाहीत, याची स्वतः ला जाणीव करून देत घनश्याम म्हणाला, व्यवस्था परिवर्तन करणे एकट्याचे काम नाही. मात्र या व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या प्रशासनात मला जायचेय. कलेक्टर होण्याचा चंग मी बांधलाय, मी तो होणारच. त्या नंतर पहा मी काय करतो ते.
शेतकऱ्यांनी कोणते पाप केले?
पाणी नाही, वीज गायब, पीकांवर पडलेला रोग, यातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. शेतकरी आत्महत्या करतात, त्यांच्या कुटुंबीयाची परवड होते. शेतकऱ्यांनी पिकवणे बंद केले तर लोक रस्त्यावर येतील. दोन आठवड्यापूर्वी कांद्याला ९० रूपये दर होता. आता १० रुपये, उत्पादन खर्च निघाला नाही. शेतकऱ्यांने असे कोणते पाप केलेत?
- घनश्याम दरोडे, श्रीगोंदे.

बॉम्बमुळे बोंबाबोंब...
घनश्यामला वाचनाची आवड आहे. स्थानिक ते जागतिक घडामोडींवर त्याचे लक्ष असते. मागील आठवड्यात उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणी बद्दल त्याने वाचलेयं. त्या संबंधी तो म्हणाला, आधी भाकर तुकड्याचे बघू द्या, बॉम्बने प्रगती होत नाही, पडल्यावर बोंबाबोंब जरूर होते.