आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गॉडफादर’पर्यंत पोहोचणार का? पिन्या अन् बाप्प्याच्या सिनेस्टाइल लुटमारीचे अनेक किस्से रंजक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लूटमार,जबरी चोरी, खुनाच्या गुन्ह्यांमुळे कुप्रसिद्ध असलेला पिन्या ऊर्फ सुरेश कापसे ( आंतरवली, ता. शेवगाव) त्याचा साथीदार बाप्पा विघ्ने ( हसनापूर, ता. शेवगाव) अटक झाले असले तरी, अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पिन्या तब्बल दीड वर्ष फरार होता. तरीही त्याने नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांत गुन्हे केले. याचा अर्थ त्याला कोणाचे तरी खंबीर पाठबळ होते. म्हणूनच पिन्याच्या ‘गॉडफादर’पर्यंत पोहाेचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या ‘गॉडफादर’च्या मुसक्या आवळल्या, तरच अनुत्तरित प्रश्न सुटणार आहेत.

पोलिस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खुनासह पिन्याने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे. खून केल्यावर काही दिवस तो परराज्यात पळून गेला. दोन महिने पोलिसांनी शेवगाव, पाथर्डी शिवारात पिन्याची शोधमोहीम तीव्र केली होती. ही मोहीम थंडावताच पिन्या पुन्हा नगरमध्ये आला. फरार असूनही शेवगाव, पाथर्डी, नेवासे, श्रीरामपूर हद्दीत त्याने जबरी चोऱ्या लुटमारीचे १० ते १२ गुन्हे केले. त्यांना पकडण्यासाठी लावललेले सापळेही फेल गेले. त्यामुळे चकमा देण्यात तो यशस्वी ठरला. कारण, पोलिसांच्या हालचालींची त्यांना खडान्खडा माहिती मिळत होती.
सहा महिन्यांपूर्वी कुकाणे (ता. नेवासे) परिसरात एका पेट्रोल पंपावर पिन्या अन् बाप्प्याची एका मुलासोबत हुज्जत झाली. या मुलाला पिन्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. बाप्प्याही त्याच्यासोबत होता. ऐनवेळी रिव्हॉल्व्हर बिघडल्याने त्यांना पळ काढावा लागला. जाताना पिन्या बजाज पल्सर दुचाकीवरून पडला. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत दोघेही पसार झाले होते. तपासात पोलिसांनी या दुचाकीचा माग काढला असता ती पिन्याच्या वडिलांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पंपावर आलेले दोघे पिन्या कापसे बाप्प्या विघ्ने हेच असल्याचे निष्पन्न झाले.

अशी जमली दोघांची यारी
पिन्याकापसे सुरुवातीला एका गुन्ह्यात काही दिवस अटकेत होता. त्या वेळी एका मित्राच्या मध्यस्थीने बाप्पा विघ्नेसोबत त्याची ओळख झाली. हीच ओळख पुढे खास दोस्तीत रूपांतरित झाली.‘जेथे पिन्या तेथे बाप्प्या’असे समीकरणच जुळले. कारण, पिन्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात बाप्प्याची त्याला साथ होती. बाप्प्या पिन्याची सावलीच बनला. ‘एकवेळ सावली अंधारात साथ सोडते, पण बाप्प्या पिन्याची दोस्ती कधीच तुटणार नाही’, अशी कोटीही गुप्त बातमीदार पोलिसांना बोलून दाखवत. सिनेस्टाइल थरारक घटनेत बीड पोलिसांनी अटक केली, तेव्हाही दोघे सोबत होते.

परराज्यात घ्यायचा आश्रय
एखादी जबरी चोरी अथवा लूटमार केली की पिन्या बाप्प्या गोवा, गुजरात, मध्य प्रदेशात पळून जायचे. लुटलेले पैसे संपेपर्यंत ते बाहेरच राहायचे. तोवर नगरमध्ये पोलिसांची शोधमोहीम थंडावली किंवा निर्धास्त वातावरण झाले, की ‘गॉडफादर’चे त्याला संकेत मिळायचे. मग, पुन्हा पिन्या बाप्प्या परत येऊन गुन्हेगारी सुरू करायचे. अशा प्रकारे जवळच्या लोकांच्या माध्यमातून पिन्याला इकडची माहिती मिळायची. म्हणूनच पिन्या बाप्प्या आजवर बिनघोर राहिले, असे पोलिस तपासात आता समोर आले आहे.

पाटोद्यातही घडला होता थरार
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पिन्या बाप्प्या यांनी एका व्यापाऱ्याला लुटले. नंतर त्यांना पळून जाताना पकडण्यासाठी प्रत्यक्षदर्शींनी शर्थीचे प्रयत्न केले. पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला ट्रक आडवा लावला. पण, पिन्याने बंदुकीचा धाक दाखवला. शेजारच्या गल्लीतून त्यांनी पळ काढला, अन्यथा चार महिन्यांपूर्वीच पाटोद्यातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पिन्या कापसे अन् बाप्प्या विघ्ने हे दोघेही गजाआड करता आले असते. त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर असल्याने त्याला पकडण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती.

पिन्याने वारंवार दिली पोलिसांना हुलकावणी
आंतरवली गावच्या सालाबाद यात्रेमध्ये पिन्या कापसे येईल, अशी पोलिसांना खात्रीशीर माहिती होती. म्हणून पोलिसांनी त्या वेळीही पिन्याला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, याचीही कुणकुण पिन्याला मिळाली. त्यामुळे पिन्या यात्रेला आलाच नाही. साहजिकच त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांना अपयश आले. पोलिसांनी लावलेले असे दोन-तीन सापळे अयशस्वी ठरले. त्यामुळे, पोलिसांच्या हालचालींची इत्थंभूत माहिती पिन्याला मिळत असल्याचे स्पष्ट आहे. पिन्याची शेवगाव परिसरात चांगलीच दहशत असल्यामुळेही त्याच्याबद्दल कोणी बोलत नव्हते.

बाप्प्याची साथ कायम
पिन्या बाप्प्याची ओळख घट्ट यारीमध्ये झाली. अटकेतून बाहेर आल्यापासून दोघेही सोबत राहात. कार्यक्रम गुन्ह्यातही दोघे सोबत असत. त्यांनी स्वत:ची टोळीही बनवली. पिन्या शीघ्रकोपी असल्याने लवकर चिडून हिंसक होतो. बाप्प्या त्याला आवरायचा. संतापी पिन्या फक्त बाप्प्याचेच ऐकतो, असेही म्हटले जाते. बाप्प्या, पिन्याचा एक अत्यंत जवळचा नातेवाईक अन् दरवेळी मदत करणारा त्याचा ‘गॉडफादर’ या तिघांमुळेच पिन्या निर्धास्त होता, असे आता स्पष्ट झाले आहे.

तो ‘पॉलिटिकल गॉडफादर’ कोण?
पिन्या वाळूतस्कर असल्याने त्याचे अन्य तस्करांसोबतही संबंध होते.राजकीय वरदहस्त पदाधिकारी असलेल्या एका ‘गॉडफादर’ची त्याला साथ होती, असे स्पष्ट आले आहे. या ‘राजकीय गॉडफादर’वर वाळूतस्करी, गँगवॉर, दरोड्याचे गुन्हे आहेत. त्यामुळे त्याला काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातून तडीपार केले होते. तेव्हाच्या खमक्या एसपींनी नेकदिलाने ही कामगिरी केली. पण, कोर्टाचे दरवाजे ठोठावून तो ‘राजकीय गॉडफादर’ काही दिवसांतच मुक्त झाला. खाकी वर्दीसोबत ऊठबस लागेबांधे असल्याने त्याच्याबद्दल उघडपणे कोणी बोलत नाहीत. पिन्या एलसीबीतील पोलिसांच्या आर्थिक व्यवहारांची खमंग चर्चा पसरवण्यातही याच ‘गॉडफादर’चे डोके असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलेे. पोलिस आता पुन्हा एकदा या ‘गॉडफादर’च्या ‘व्हाइट कॉलर’ला हात घालणार का? हा खरा प्रश्न आहे.
बातम्या आणखी आहेत...