आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावळा गोंधळ : 40 लाखांचे सौरदिवे पाच वर्षांपासून बंद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच अमरधाममध्ये सुमारे 40 लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेले सौरदिवे मागील पाच वर्षांपासून बंद आहेत. आतापर्यंतच्या सत्ताधा-यांनी दिव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. दुरुस्ती दूरच, सुरक्षा नसल्याने दिव्यांच्या हजारो रुपयांच्या बॅट-या चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे हे दिवे आता केवळ शोभेपुरतेच उरले आहेत. या निमित्ताने मनपातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे.
महाराष्ट्र राज्य विकास अभिकरणकडून सहा वर्षांपूर्वी मिळालेल्या 40 लाखांच्या अनुदानातून महालक्ष्मी, सिद्धीबाग, अमरधाम, जॉगिंग ट्रॅक अशा विविध ठिकाणी 50 सौरदिवे बसवण्यात आले होते. ठेकेदाराने वर्षभर या दिव्यांची देखभाल-दुरुस्ती केली. त्यानंतर महापालिकेने दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांचे हे दिवे भंगारात जमा झाले. सहा वर्षात महापालिकेत तीनदा सत्तांतर झाले. मात्र, कोणत्याच सत्ताधा-यांना दिव्यांच्या दुरुस्तीची आठवण झाली नाही. दिवे बंद पडल्याने मनपातील विद्युत विभागाला जबाबदार धरण्यात आले. दुरुस्तीसाठी मात्र आतापर्यंत एकदाही तरतूद करण्यात आली नाही. विशेष म्हणजे सौरदिव्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी मनपाकडे एकही तंत्रज्ञ नाही. त्यामुळे दुरुस्ती करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानांची सुरक्षा रामभरोसे असल्याने दिव्यांच्या हजारो रुपयांच्या बॅट-या चोरीस गेल्या आहेत. काही बॅट-या विद्युत विभागात जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दिव्यांचे आता केवळ सांगाडेच उभे आहेत. नागरिक जेव्हा उद्यानांत जातात, त्या वेळी अनेक जण सौरदिव्यांकडे मोठ्या कुतूहलाने पाहतात. दिवे अनेक वर्षांपासून उभे आहेत, परंतु त्यांचा प्रकाश नागरिकांना पाहायला मिळत नाही. ही नामुष्की झाकण्यासाठी मनपाने या सौरदिव्यांच्या ठिकाणी दुसरे दिवे लावले आहेत. त्यामुळे उद्यान, अमरधाम व जॉगिंग ट्रॅकवर काही प्रमाणात प्रकाश मिळतो, परंतु 40 लाख खर्चाच्या सौरदिव्यांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे मनपाला दरमहा सुमारे दीड कोटींचे वीजबिल भरावे लागते, तर दुसरीकडे विजेची बचत करणा-या सौरदिव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. या दिव्यांची वेळेत दुरुस्ती झाली असती, तर आतापर्यंत मनपाचे लाखोंचे वीजबिल वाचले असते, परंतु सत्ताधा-यांसह प्रशासनालाही त्याचे काहीच देणे-घेणे नाही. नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करून त्यातूनच वीजबिल भरले जाते. त्यामुळे सौरदिव्यांची दुरुस्ती झाली असती, तर नागरिकांचे लाखो रुपये वाचले असते. सत्ताधारी केवळ विकासाच्या गप्पा मारतात, प्रत्यक्षात नवीन विकासकामे तर दूरच, आहे त्या सुविधाही त्यांना नागरिकांना देता येत नाहीत. निवडणूक जवळ आली की, नागरिकांना मोठी आश्वासने द्यायची, निवडून आल्यानंतर मात्र नागरिकांकडे ढुंकूनही न पाहण्याची सत्ताधा-यांची जुनी सवय आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
उद्यानातील दिवे उरले शोभेपुरते...
नधीअभावी दुरुस्ती नाही
- सौरदिवे बसवल्यानंतर पुणे येथील महाराष्ट्र राज्य विकास अभिकरणने तपासणी करून तसे प्रमाणपत्र महापालिकेला दिले होते. त्यानंतर ठेकेदार संस्थेने ठरावीक मुदतीत दिव्यांची देखभाल, दुरुस्ती केली; परंतु त्यानंतर तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध नसल्याने तसेच निधीची तरतूद नसल्याने दिव्यांची दुरुस्ती झाली नाही.’’बाळासाहेब साळवे, विद्युत विभागप्रमुख
ढसाळ कारभाराचे उदाहरण
- महापालिकेच्या कारभारात अनेक त्रुटी आहेत. सत्ताधारी केवळ श्रेय घेण्यासाठी कामे मंजूर करतात. मात्र, नंतर या कामांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. सौरदिव्यांप्रमाणे अनेक कामांची दुरवस्था झाली आहे. योग्य नियोजन केले, तर सौरदिव्यांसारखा लाखोंचा खर्च वाया जाणार नाही.’’ एम. डी. गोसावी, ज्येष्ठ नागरिक
सौरदिव्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद आवश्यक
शहराच्या विविध भागांत पथदिवे व एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. सौरदिव्यांप्रमाणेच त्यांची अल्पावधीत दुरवस्था झाली आहे. अनेक दिवे बंद पडले असून त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. सौरदिव्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.