आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिव्यांचा गैरव्यवहार दडपण्याचा महापालिकेकडून पुन्हा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पथदिव्यांच्या ज्या कामांत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत, ती कामे सोडून भलत्याच कामांची चौकशी करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. कोट्यवधींच्या पथदिव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी आहेत.
प्रशासन मात्र चांगल्या कामांच्या चौकशीचा फार्स करून हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व कामांची गुणनियंत्रक दक्षता मंडळामार्फत चौकशी करावी; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा तक्रारदार शाकीर शेख यांनी दिला आहे.
नगरोत्थान अभियानांतर्गत सुमारे दहा कोटींची कामे करण्यात आली. या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखा परीक्षण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रक दक्षता मंडळामार्फत या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मनपा प्रशासनाकडे केली. त्यानुसार मनपाने या कामाची चौकशी करावी, असे पत्र गुणनियंत्रक दक्षता मंडळाला दिले. सर्व कामांच्या चौकशीसाठी सुमारे ३५ लाख रुपये शुल्काची मागणी मंडळाने मनपाकडे केली होती.
प्रशासनाने तसा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठवला, परंतु स्थायीने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर प्रशासनाने केवळ पाइपलाइन रस्त्यावरील ५० लाख रुपये खर्चाच्या कामाच्या चौकशीसाठी लागणारे अडीच लाख रुपयांचे शुल्क गुणनियंत्रक दक्षता मंडळाकडे जमा केले. परंतु एकुण विद्युतीकरणाच्या कामात पाइपलाइन रस्त्यावरील पथदिव्यांचे काम चांगले झाले आहे, असे असतानाही या कामाच्या चौकशीसाठी शुल्क भरणात आले. ज्या कामात गैरव्यवहार झाला, त्या पाच कामांकडे मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
पाइपलाइन रस्त्यावरील कामाची तपासणी गुणनियंत्रक दक्षता मंडळाने सुरू केली आहे. परंतु सर्व कामाची चौकशी झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा तक्रारदार शेख यांनी दिला आहे. त्यामुळे पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चव्हट्यावर येणार आहे.

काय निघाले तपासणीत?

गुण नियंत्रक दक्षता पथकाने गुरूवारपासून पाइपलाइन रस्त्यावरील पथदिव्यांच्या कामाची तपासणी सुरू केली. पथदिव्यांच्या खड्डयात काँक्रिटऐवजी केवळ दगडमातीच निघाले. खड्ड्यांचे आकारमान निम्म्यापेक्षा कमी भरले. पथदिव्याचा प्रकाश ३० लक्स आवश्यक आहे. परंतु हा प्रकाश केवळ १२ लक्स एवढाच भरला. पथदिव्यांचे फिटींगही ब्रॅण्डेड नाही. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सन्माननीय नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोहोळे यांनी केली आहे.

"दिव्य मराठी'चा पाठपुरावा सुरूच

पथदिव्यांतील गैरव्यवहाराबाबत "दिव्य मराठी' गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. गैरव्यवहार मांडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले. कामाची सार्वजनिक बांधकामच्या गुणनियंत्रक दक्षता मंडळामार्फत चौकशी करावी, या मागणीचादेखील वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर एका कामाची चौकशी सुरू झाली. उर्वरित कामाचीदेखील चौकशी व्हावी, यासाठी "दिव्य मराठी' पाठपुरावा करणार आहे.