आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहाराची तातडीने चौकशी करावी, या मागणीसाठी युगंधर युवा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी सकाळी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी आठ दिवसांत चौकशी न झाल्यास आयुक्तांसह दोषी अधिकार्यांवर फिर्याद दाखल करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
नगरोत्थान अभियानांतर्गत सुमारे 12 कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांत पथदिवे उभारण्यात आले आहेत. या कामात सुमारे 7 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप प्रतिष्ठानने दीड महिन्यापूर्वी केला होता. या प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधित ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत; अन्यथा आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा प्रतिष्ठानने दिला होता. त्याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी आयुक्त कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर महापालिका कार्यालयात आयुक्तांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकार्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मनपा प्रशासनाने पथदिव्यांच्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखा परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु आठ महिने उलटले, तरी लेखा परीक्षणाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. उलट ठेकेदारांची बिले देण्याची घाई प्रशासनाने केली. मुळात पथदिवे व एलईडीसाठी 12 कोटींचा खर्च दाखवण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात ही कामे केवळ 6 ते 7 कोटींचीच आहेत. त्यामुळे मनपा व नगरकरांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून या कामाची तातडीने चौकशी करणे आवश्यक असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन व विळद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने लेखा परीक्षण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता पुणे येथील एका शासकीय संस्थेमार्फत लेखा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्या विद्युत विभागातील अभियंत्याला तातडीने संबंधित संस्थेकडे पाठवून लवकरात लवकर लेखा परीक्षण प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.