आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"टीईटी'च्या पेपरला जिल्ह्यातील १ हजार ६६३ परीक्षार्थींची दांडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) विविध माध्यमांच्या पहिल्या व दुसऱ्या पेपरसाठी २४ हजार ८०५ उमेदवार बसले होते. त्यापैकी १ हजार ६६३ उमेदवारांनी दांडी मारली. पेपर फुटल्याची चर्चा सुरू असल्याने परीक्षार्थी अस्वस्थ झाले होते.
केंद्र सरकारने ३१ मार्च २०१० रोजी अधिसूचना काढून शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण परिषदेला (एनसीटीई) शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले. राष्ट्रीय शिक्षण परिषदेने २३ ऑगस्ट २०१० व २९ जुलै २०११ रोजी अधिसूचना काढून प्राथमिक शिक्षकांसाठी (पहिली ते आठवी) किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केली. त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली गेली. रविवारी सकाळ व दुपार या दोन सत्रात ही परीक्षा झाली.
सकाळी पहिले ते पाचवीसाठी पहिला पेपर झाला. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून उर्दू, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या १४ हजार ६१४ उमेदवारांनी अर्ज केला होता. पैकी १३ हजार ७२४ जण हजर, तर ८९० जण गैरहजर होते. मराठी माध्यमातील सर्वाधिक १३ हजार ७२४ उमेदवार परीक्षेला बसले होते. पैकी ८७५ गैरहजर होते. उर्दू माध्यमाच्या २४४ उमेदवारांपैकी २३६ जण हजर होते. ८ उमेदवारांनी दांडी मारली. इंग्रजी माध्यमाच्या ११६ उमेदवारांपैकी २३६ जणांनी परीक्षा दिली. ७ उमेदवार गैरहजर होते. दुपारी सहावी ते आठवीसाठी १० हजार १८७ उमेदवार परीक्षेला बसले होते. पैकी ९ हजार ४१८ उमेदवार हजर होते, तर ७६९ उमेदवारांनी दांडी मारली.

दरम्यान, रविवारी सकाळपासूनच टीईटीचा पेपर फुटल्याची चर्चा शहरात सुरू होती. माळीवाडा परिसरात पेपरच्या झेरॉक्स वाटल्या गेल्याच्या चर्चेमुळे परीक्षा यंत्रणेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तथापि, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या परीक्षेमुळे परीक्षा केंद्रांच्या परिसरात सकाळी मोठी गर्दी झाली होती. शहर बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या अनेकांची मोठी गैरसोय झाली.