आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग वाढवणे गरजेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुलांच्या जडणघडणीत पालक म्हणून आपण किती सजग आहोत, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. मुलांच्या शिक्षणात शिक्षकांबरोबरच पालकांचा सक्रिय सहभाग असायला हवा, असे प्रतिपादन डॉ. अंशू मुळे यांनी गुरुवारी केले.

सावेडीतील सखाराम मेहेत्रे प्राथमिक व केशवराव गाडीलकर हायस्कूलमध्ये आयोजित माता-पालक मेळाव्यात "स्वच्छता, आरोग्य व बालकांचे पोषण' या विषयावर डॉ. मुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेविका मनीषा बारस्कर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून ललिता दळवी, भावना गुंफेकर आदी उपस्थित होत्या.

विद्यार्थी अध्ययन व अध्यापन पद्धतीत पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी महात्मा फुले एज्युकेशन संस्थेचे सचिव नामदेवराव गाडीलकर यांच्या कल्पनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. मुळे म्हणाल्या, शाळेत होणाऱ्या पालकसभेला वर्षातून एकदाच जायचे, अशी पालकांची चुकीची भूिमका असते. आपण सर्वजण पालक म्हणून विद्यार्थीच आहोत. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पाल्यांच्या स्वच्छ गणवेशाबाबतही पालकांनी जागरूक असावे. गणवेश स्वच्छ असेल, तर आत्मविश्वास वाढतो. बहुतांश मुलांना डबा दिला जात नाही. अशी मुले शालेय आहारावरच अवलंबून असतात. आपली मुले आरोग्यसंपन्न, सुदृढ राहण्यासाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. पौष्टिक आहार नसेल, तर हिमोग्लोबीन, कॅल्शिअमची कमतरता येते. अभ्यासात लक्ष लागत नाही, रात्री झोपेत हात-पाय दुखतात, सकाळी उठण्याचा मुले कंटाळा करतात. मुलांच्या अशा समस्यांकडे आईने लक्ष द्यावे. मुलांना बाहेरच्या खाऊची सवय लावू नये. अशा सवयीमुळे आपण मुलांचे नुकसान करत असतो, असे डॉ. मुळे यांनी सांगितले.
मुलांच्या हातून अनुचित कृती घडणार नाही याची काळजी घ्या. काही चांगले केल्यास शाबासकी द्या. एखाद्या निर्णय प्रक्रियेत मुलांचेही मत विचारात घ्या, आपले चुकल्यास मुलांची माफी मागा, असा सल्लाही डॉ. मुळे यांनी यावेळी दिला.

बालक गुबगुबीत असले म्हणजे सुदृढ नव्हे. जे बालक रात्री शांत झोपते, भूक लागते, दिवसभर उत्साही असते ते बालक सुदृढ समजावे, अशी सुदृढ बालकाची व्याख्या डॉ. मुळे यांनी सांगितली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका मनीषा बनकर यांनी करून दिला. यावेळी पालकांसाठी रांगोळी, मेहंदी, लिंबूचमचा, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. सूत्रसंचालन मनीषा डुंबरे यांनी, तर आभार संगीता बनकर यांनी मानले.