आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एड्सग्रस्तांसाठी उभारला लाखांचा निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून आयकॉन विद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी सत्यमेव जयते हे नृत्यनाट्य सादर केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यालयातील विद्यार्थी कलाकार अध्यापकांनी स्नेहालयमधील एड्सग्रस्तांसाठी असलेल्या स्नेहदीप रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी लाखांचा निधी उभारला.

देशाचे भविष्य म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या बालकांचे सामाजिक कुप्रथांनी ग्रासलेले भयावह वास्तव, सक्षम कायदे होऊनही महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे जळजळीत वास्तव, राजकारणातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार आदी बाबी दर्शवणारे सत्यमेव जयते हे नृत्यनाट्य प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयकॉनच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाची दखल सत्यमेव जयते उपक्रमाचे प्रेरक अभिनेते आमीर खान यांनी घेऊन कलाकार आयोजकांसाठी संदेश पाठवला. या कार्यक्रमातून कलाकार अध्यापकांनी स्नहेदीप रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा दिली. या उपक्रमाच्या ध्वनिचित्रफितीचे लाेकार्पण करण्यात आले. देशातील प्रमुख समस्यांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करून आणि त्यांच्याच माध्यमातून जनजागरण करण्याच्या आमीर खान यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून देशात सर्वप्रथम नगर जिल्ह्यात हा उपक्रम करण्यात येत असल्याचे विद्यालयाच्या प्राचार्य आराधना राणा यांनी सांगितले.
या वेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार, शरद मुथा, राजीव गुजर, डॉ. सुहास घुले, संजय गुगळे, कर्नल आर. सी. राणा, दीपिका नगरवाला, यास्मीन काझी, रोहित परदेशी, सुवालाल शिंगवी आदी उपस्थित होते.

आयकॉन विद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी "सत्यमेव जयते' हे नृत्य-नाट्य सादर केले.