आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात बसून चिमुकले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची पडझड झाल्यामुळे विद्यार्थी गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरात बसून धडे गिरवत आहेत. शिक्षण विभागाकडून नवीन खोल्यांच्या मंजुरीस परवानगी देण्यास टाळाटाळ होत असल्यानेच विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे.

क ोळगाव येथी जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत 87 विद्यार्थी शिक्षण घेतात. पटसंख्येनुसार तीन शिक्षक कार्यरत असले, तरी तीन वर्ग खोल्या उपलब्ध नाहीत. उपलब्ध खोल्यांच्या भिंती पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. या शाळेला जिल्हा परिषदेची एकच खोली आहे. दोन खोल्या गावकर्‍यांनी इतर योजनेतून बांधल्या. या भिंतींना समोरच्या बाजूने पडवी नाही. मागील बाजूची दगडी भिंत पडलेली आहे. त्यामुळे तेथे वर्ग भरत नसले, तरी मुले फिरताना दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मुलांना बसण्यासाठी एकच खोली आहे. त्यात शालेय दप्तर व खिचडी शिजवण्याचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थ्यांना अडगळीत बसून शिक्षण घ्यावे लागते.

नवीन बांधकामासाठी जागा उपलब्ध असताना केवळ चुकीच्या निकषावर शिक्षण विभागाने बांधकामाची मंजुरी रखडवल्याने विद्यार्थ्यांना गावच्या मारुती व विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकारी बैठकांवर बैठका घेत असताना मंदिरात भरणार्‍या या शाळेबद्दल कोणालाही सोयरसुतक नाही. सध्या या शाळेचा एक वर्ग मारुती मंदिरात, तर दुसरा वर्ग विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात भरत आहे. दर्शनासाठी येणार्‍या तसेच चावडीवर गप्पा मारणार्‍या टग्यांमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.

..तर ग्रामस्थ आंदोलन करणार
जुन्या पडलेल्या वर्गखोल्या पाडून नवीन इमारतीचे बांधकाम न केल्यास आंदोलन करणार असल्याचे शोभा गोर्डे, लता झिरपे, सुभद्रा चव्हाण, काकासाहेब झिरपे, चंद्रकांत झिरपे, ज्ञानदेव चव्हाण, मनोहर झिरपे यांच्यासह आदी ग्रामस्थांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.