आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरीत विद्यार्थ्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शालेय विद्यार्थ्यांना बिस्किटे व चॉकलेटचे आमिष दाखवत पळवून नेण्याचा प्रयत्न सोमवारी फसला. हा प्रकार राहुरी फॅक्टरी येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. संतप्त पालकांनी नंतर नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको केला.

प्रसादनगर व आदिनाथ वसाहत परिसरातील 10 ते 12 विद्यार्थी गादीवाले काका यांच्याशेजारील अरुंद बोळीतून येत होते. चार-पाच अज्ञात व्यक्तींनी फिरोजा रफिक शेख, इम्रान रफिक शेख, नजिम शफिक शेख या विद्यार्थ्यांना बिस्किट, चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकताच परिसरातील नागरिक धावून आले. तोपर्यंत त्या व्यक्तींनी पोबारा केला. बिस्किटे व चॉकलेट देत हाताला धरून आमच्याबरोबर चला, असे ते म्हणाल्याचे शहाजब गनी शेख या पाचवीतील विद्यार्थ्याने जमलेल्या लोकांना सांगितले.

हे वृत्त समजताच संतप्त पालकांनी नगर-मनमाड रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे राज्यमार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आंदोलनस्थळी येत पालकांना शांत केले. पालकांच्या भावना समजून घेऊन ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींकडून खाऊ, बिस्किट, चॉकलेट घेऊ नये व कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तशा सूचना पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्याव्यात. यावेळी सुरेश वाबळे, अरुण ढूस, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गुंफा संसारे, प्राचार्य भारती बोरकर, उपप्राचार्य रमेश वारुळे आदी उपस्थित होते.

पोलिसांना घटनेचे गांभीर्यच नाही
राहुरीच्या पोलिस ठाण्यात एक वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चार उपनिरीक्षक व सहायक फौजदार असताना घटनास्थळी अवघा एक पोलिस पाठवण्यात आला. राहुरी शहर व तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात छेडछाडीचे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याचा बंदोबस्त करावा, असे गेल्या आठवड्यात माजी खासदार तनपुरे यांनी पोलिस निरीक्षक अशोक रजपूत यांना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्याकडेही दुर्लक्ष केले.