आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांच्या दालनाबाहेर भरली शाळा; रस्ता बंद झाल्याने विद्यार्थी, पालक संतापले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - शाळेत जाण्या-येण्याचा रस्ता काही लोकांनी दगड टाकून बंद केल्याने साडेतीनशे विद्यार्थ्यांची शाळा सोमवारी तहसीलदारांच्या दालनाबाहेर भरली. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यासमोर संबंधितांनी कैफियत मांडल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात हा रस्ता मोकळा करुन देण्याचे आदेश पोलिसांना दिले. 
 
चंदनापुरी येथील वहिवाटीचा रस्ता काहींनी जाणीवपूर्वक बंद केल्याने तेथील रहिवाशांबरोबरच मुलांचे आठवडाभरापासून हाल सुरु आहेत. सोमवारी शाळेच्या वाहनातून साडेतीनशे विद्यार्थी तहसील कार्यालयात आले. शाळेला रस्ता करुन देण्याच्या मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. तहसीलदार सोनवणे यांनी संबंधितांना बोलवून घेत वस्तुस्थिती जाणून घेतली. 
 
कौठमळा येथे इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल असून चंदनापुरीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेजवळूनच चंदनापुरी-धांदरफळ रस्ता जातो. वहिवाटीच्या या रस्त्यावर लगतच्या काही मिळकतधारकांनी दगड, तोडलेली झाडे टाकली. परिणामी विद्यार्थ्यांचे हाल सुरु झाले. त्यांना घेऊन येणाऱ्या स्कूल बस अर्धा किलोमीटर अलिकडेच विद्यार्थ्यांना सोडू लागल्या. दगड तुडवत विद्यार्थी अर्धा किलोमीटरचे पायी जाऊ-येऊ लागले. 
चारपासून चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना पायी रस्ता तुडवत ये-जा करावी लागत असल्याने त्यांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने सोमवारी विद्यार्थी न्यायासाठी थेट तहसीलदारांच्या दालनात आले. शाळेच्या वतीने तहसीलदारांसमोर बाजू मांडण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीनेदेखील या प्रकाराची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. मात्र, यासंदर्भात काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने तहसीलदारांना निर्णय घेणे अशक्य झाले. 
 
स्थानिक रहिवासी, ग्रामपंचायत आणि शाळा अशांचा एकत्रितरित्या प्रश्न निर्माण झाल्याने तहसीलदारांनी तात्पुरत्या स्वरुपात हा रस्ता न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मोकळा करुन देण्याचे आदेश पोलिस प्रशासनास दिले. यासंबधीच्या सूचना पोलिस निरीक्षकांना देण्यात आल्या. त्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...