आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेताना विद्यार्थ्यांची अडवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वडगाव गुप्ता येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल डेंटल कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेताना विद्यार्थ्यांकडून विनापावतीचे 500 रुपये घेतले जातात. त्याशिवाय परीक्षा अर्जांचे वाटप केले जात नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याबाबतचे निवेदन सोमवारी प्राचार्यांना दिले. अडवणूक थांबली नाही, तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

मनविसे जिल्हाध्यक्ष वैभव सुरवसे यांनी प्राचार्य डॉ. सुरेश खियानी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून घेताना 500 रुपयांची मागणी केली जाते. याची कोणतीही पावती दिली जात नाही. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कारकीर्द धोक्यात येण्याच्या भीतीने हे पैसे भरले आहेत, पण ज्या विद्यार्थ्यांनी हे पैसे भरलेले नाहीत त्यांना परीक्षेला बसू न देण्याची, तसेच त्यांच्या गुणांवर परिणाम होण्याची भीती महाविद्यालय प्रशासनाकडून दाखवली जात आहे.

हा प्रकार त्वरित थांबवावा अन्यथा ‘मनविसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी झालेल्या चर्चेत उपशहराध्यक्ष अभिषेक मोरे, पल्लवी तायडे, सुमीत डफळ, नीलेश भुतारे यांच्यासह अभिषेक देशमुख, वैभव लोटके, सचिन कलंके, अमोल मोरे, तेजस्विनी गवारे, सोनल बेंद्रे यांनी भाग घेतला. सुरुवातीला प्राचार्यांनी अशी अडवणूक होत नसल्याचे सांगितले, परंतु पदाधिकार्‍यांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर भविष्यात काळजी घेऊ, असा खुलासा प्राचार्यांनी केला.