आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Suffering From Folic Acid And Iron Tablets

संगमनेर तालुक्यात फोलिक अँसिड, आयर्नच्या गोळ्या घेतल्याने विद्यार्थ्यांना पोटदुखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथील शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाने दिलेल्या रक्त व कॅल्शियम वाढीच्या गोळ्यांमुळे पोटदुखीचा त्रास झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. भगवतीमाता विद्यालयात घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली. पोटदुखीचा त्रास सुरु झालेल्या पाचपैकी चारजणांवर खासगी रुग्णालयात, तर एका विद्यार्थिनीवर घारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोग्य विभागाच्या तपासणीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत रक्त व कॅल्शियमची कमतरता जाणवल्याने त्यांना फोलिक अँसिड व आयर्नच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. भगवतीमाता विद्यालयातील 8 वी ते 10 वीच्या वर्गातील मुला-मुलींना या गोळ्यांमुळे दुपारी साडेचारच्यादरम्यान पोटदुखीचा त्रास सुरु झाला, असे मुख्याध्यापक डी. बी. शिरोळे यांनी सांगितले.

स्वामी पोपट करंजेकर (13), सोनाली दीपक भागवत (13), आशा शिवाजी वाडगे (13), अजय शिवाजी धुमाळ (13, सर्व इयत्ता 9 वी) व वर्षा शिंदे (14, इयत्ता 10 वी) या विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वर्षा शिंदे हिच्यावर घारगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अन्य चारजणांवर खासगी दवाखान्यात उपचार करुन घरी जाऊ देण्यात आले.

उपाशीपोटी गोळ्या खाल्ल्याने त्रास
शाळेतील 250 विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. पाचजणांना मळमळ व पोटदुखीचा त्रास झाला. गोळ्यांवरील बॅच नंबर तपासून त्यांचे वाटप थांबवण्यात आले आहे. संबधित विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी अथवा कमी जेवण केल्याने त्यांना हा त्रास जाणवल्याची शक्यता आहे. डॉ. आर. एम. पटेल, वैद्यकीय अधीक्षक, घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र.