आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतील भांडणातून विद्यार्थ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शाळेत झालेल्या भांडणाविषयी पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे घाबरलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल विठ्ठल गायकवाड (वय १६, आगडगाव, ता. नगर) असे या मुलाचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी आगडगावात घडला. निखिलच्या चुलत्याच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी याप्रकरणी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे.
बुऱ्हाणनगर येथील बाणेश्वर विद्यालयात आगडगाव देवगावचे विद्यार्थी बसमधून शाळेत येतात. दोन तीन दिवसांपूर्वी दोन्ही गावच्या मुलांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. त्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या विलास गोकुळ पगारे (वय२४, रा. देवगाव, ता. नगर) या युवकाची निखिल गायकवाडसोबत बाचाबाची झाली. वादाचे पर्यावसान नंतर हमरातुमरीत झाले. विलास पगारेने याविषयी तक्रार देण्यासाठी सुरूवातीला नगर तालुका पोलिस ठाणे गाठले. नंतर तो भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गेला.

कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तक्रार अर्ज स्वीकारून घटनास्थळी भेट दिली. नंतर आगडगावात जाऊन तक्रारीची शहानिशा केली. त्यावेळी निखिलचे वडील विठ्ठल गायकवाड विलास पगारे यांनी एकमेकांना ओळखले. मुलांमध्ये झालेले वाद आपसांत मिटवून घेत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे भिंगार पोलिस माघारी परतले. दुसरीकडे आपल्यावर गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने निखिलने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

गुरुवारी रात्री निखिलचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सकाळी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आगडगावच्या ग्रामस्थांनी शोकसभा घेतली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, उपअधीक्षक आनंद भोईटे, तानाजी बर्डे, सहायक निरीक्षक प्रशांत मंडले यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात होता.

चुलत्याने दिली फिर्याद
निखिलचे चुलते मारुती भास्कर गायकवाड यांनी याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाळेत झालेल्या भांडणाच्या वेळी विलास गोकुळ पगारे काही मुलांनी निखिलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याला अॅट्रोसिटी कायद्यानुसार तुझ्यावर गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या निखिलने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसंानी याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

फौजफाटा तैनात
शुक्रवारी सकाळी निखिल गायकवाड याच्यावर आगडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. देवगाव आगडगावच्या मुलांमध्ये नेहमीच बसमध्ये वाद होतात. त्यातूनच हा प्रकार घडला. पोलिसांनी टारगट प्रवृत्तीच्या युवकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आगडगाव, कापूरवाडीच्या ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला. दिवसभर गावात राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
बातम्या आणखी आहेत...