आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Educational Tour Issue At Nagar, Divya Marathi

मंगळ व चंद्रावरील खडकाचा नमुना पाहून विद्यार्थी हरखले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मंगळ आणि चंद्रावरील खडक कसे असतात, हे बघण्याची संधी नेप्ती येथील श्रीछत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाली. हे नमुने पाहताना सगळे विद्यार्थी हरखून गेले.

बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयात पुस्तकी ज्ञानावर भर दिला जातो. पुस्तकी ज्ञानाबरोबर विविध कंपन्यांच्या व प्रकल्पांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. हाच उद्देश समोर ठेवून प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांच्या अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले.
स्थापत्य विभागातील विद्यार्थ्यांची सहल सिन्नर येथील गारगोटी संग्रहालय व रेडिमिक्स काँक्रीट प्रकल्प पाहण्यासाठी नेण्यात आली. द्रूतगती महामार्ग, उड्डाणपूल, बोगदे, विद्युत केंद्र आदींच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या काँक्रीटची निर्मिती कशी केली जाते, याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. गारगोटी संग्रहालयात खडकांच्या विविध प्रकारांबरोबर मंगळ व चंद्रावरील खडकांचे नमुने विद्यार्थ्यांना पहायला मिळाले.

इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी बीएसएनएल भवनास भेट दिली. मोबाइल व ब्रॉडबँड, स्मार्टफोन, जीएसएम यांची कार्यपद्धती व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना तेथे पहावयास मिळाले. ऑप्टिकल फायबर संदेशवहन त्यांनी समजावून घेतले.

मेकॅनिकल शाखेचे विद्यार्थी कोल्हापूर येथील जलविद्युत निर्मिती केंद्र पाहण्यासाठी गेले होते. पाण्यापासून वीज कशी तयार केली जाते, पाण्याचा दबाव व प्रवाह कसा निर्माण केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. शीतकरण गृह व स्वयंचलित कॉम्प्युटराईज्ड न्यूमरिक कंट्रोलची माहितीही त्यांनी घेतली.

या सहली उपयुक्त ठरल्याने यापुढील काळात उत्तम अभियंते तयार करण्यासाठी व्यापक दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ. देशपांडे यांनी सांगितले.