आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमृतवाहिनी’त विद्यार्थी-पालक मेळावा; मुले व पालकांमधील संवाद वाढण्याची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या जिद्द आणि आत्मविश्वासावर असते. त्यांच्या या यशाचा पाया पालकांच्या सहभाग व प्रोत्साहनावर अवलंबून असल्याने अमृतवाहिनी आभियांत्रिकी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा मेळावा रविवारी (3 ऑगस्ट) महाविद्यालयाच्या अमृत कलामंच सभागृहात बोलावण्यात आला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जे. विखे यांनी दिली. मुलांचा हल्ली वाढत असलेला एकटेपणा, बदललेली परीक्षा पद्धती यांचा विचार करता मुले व पालकांतील संवाद वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकांनी मुलांसाठी प्रभावी पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्याची गरज असून त्यासाठी त्यांचे मुलांसोबत मैत्री व विश्वासाचे नाते निर्माण करून त्यांच्या मर्यादा ओळखणारा पालनकर्ता असणे महत्त्वाचे आहे.

अमृतवाहिनी महाविद्यालयात अभ्यासाव्यतिरिक्त विविध तांत्रिक कार्यक्रम, कार्यशाळा, तांत्रिक विषयातील निपुण असलेल्या मान्यवरांशी विद्यार्थ्यांचा संवाद आदी विद्यार्थी पूरक कार्यक्रम घेतले जातात. प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तकांचा संच ‘बुक बँक’ योजनेंतर्गत महाविद्यालय मोफत देते. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी स्वतंत्र लिंगो फोनसहित लँग्वेज लॅबची सुविधा, इंटरनेट लिजलाइन व चोवीस तास वायफाय सुविधा, रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यासिकेचा वापर आदी बाबींसंबंधी या मेळाव्यात माहिती दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी जीमखाना, परीक्षा नियमावलीनुसार 75 टक्के उपस्थिती, विद्यार्थी निवासस्थान, प्राध्यापक परिचय, पालक व विद्यार्थ्यांत समन्वय ही या मेळाव्याची वैशिष्ट्ये असून नवीन ऑनलाइन परीक्षा पद्धत व इतर नियमांवर विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा तास रविवारी रंगणार आहे. मेळाव्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.