नगर: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी शाळांवर आहे. दर्जेदार शिक्षणाबरोबरच मैदानी खेळालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. सेंट विवेकानंद स्कूल विद्यार्थ्यांना खेळासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करते. या स्पर्धांमुळे मैदानापासून दूर चाललेले विद्यार्थी पुन्हा मैदानाशी जोडले जात आहेत, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
तारकपूर येथील सिंधी एज्युकेशन सोसायटी संचलित सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५४ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘विवेकानंद ट्रॉफी २०१७’ जिल्हास्तरीय शालेय व्हॉलिबॉल कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन हवेत फुगे सोडून महापौर कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक योगिराज गाडे, सोसायटीचे अध्यक्ष गिरधारीलाल मध्यान, सचिव दामोदर बठेजा, सदस्य रुपचंद मोटवानी, कबड्डी असोसिएशनचे सदस्य एल. बी. म्हस्के, मळुराम सातपुते, प्राचार्य गीता तांबे, उपप्राचार्य कांचन पापडेजा, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोदावरी कीर्तानी आदींसह सहभागी झालेल्या शाळांचे क्रीडाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गाडे म्हणाले, स्वामी विवेकानंद हे तरुणांचे आदर्श आहेत. त्यांच्या विचाराने काम करणारी सेंट विवेकानंद शाळा वर्षभर चांगले उपक्रम राबवते विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती वाढण्यासाठी अशा स्पर्धा फार उपयोगी असतात. जीवनामध्ये खेळाडूवृत्ती जपल्यास यश नक्कीच मिळते.
बठेजा यांनी सांगितले, हार-जीत जीवनात होतच असते. मात्र, संघर्ष करत जो पुढे जातो, तो नक्कीच यशस्वी होतो. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड वाढावी, यासाठी दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंतीच्या औचित्याने या स्पर्धा आम्ही घेतो. दरवर्षी मोठा प्रतिसाद जिल्ह्यातील शाळांमधून मिळतो.
प्रास्ताविकात प्राचार्य तांबे यांनी सांगितले, गेल्या सात वर्षांपासून व्हॉलिबॉल कबड्डी स्पर्धांचे आयोजन सेंट विवेकानंद स्कूल करत आहे. प्रत्येक वर्षी स्पर्धेचे स्वरूप वाढत आहे. यावर्षी २४ शाळांच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कोटस्थानी शिरीन शेख यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्तीची शपथ देण्यात आली. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योग रिंग प्रात्यक्षिकांनी सर्वांची मने जिंकली. क्रीडाशिक्षक अमोल धोपावकर यांनी स्पर्धेचे संयोजन केले.