आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Students Take Rally On Pune University Sub Centre

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रावर विद्यार्थ्यांचा मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे पुणे विद्यापीठाच्या आडमुठेपणामुळे नुकसान होत आहे, असा आरोप करीत आमदार अनिल राठोड यांनी विद्यार्थी संघटनांसह बुधवारी सकाळी पुणे विद्यापीठ उपकेंद्रावर मोर्चा नेला. मोर्चात सुमारे सव्वाशे विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी यावेळी उपकेंद्र संचालकांना दिला.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या काही जाचक नियमांचा फटका बसत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आमदार राठोड व युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनात विश्वभारती, रायसोनी, विखे, आडसूळ, छत्रपती शिवाजी या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी, तसेच शिवसेना व छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये विद्यापीठाचा निषेध व्यक्त करणारे फलक होते. नंतर संचालक एस. एस. रिंढे यांच्या दालनात आमदार राठोड व विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला. विद्यापीठाच्या गलथान कारभाराबाबत रिंढे यांच्याकडे तक्रार करण्यात आली.

आमदार राठोड म्हणाले, अभ्यासक्रमात, तसेच परीक्षेत वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आगामी परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांना कुठलीच माहिती नसते. विद्यापीठाने आपली चूक दुरुस्त करून ‘कॅरिऑन’ नियम लागू करावा व हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे. इतर अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्यामुळे विद्यापीठाने ‘कॅरी ऑन’ हा नियम लागू केला आहे. पुणे विद्यापीठाकडून होत असलेल्या चुका कुलगुरुंच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत.

विक्रम राठोड म्हणाले, ‘कॅरिऑन’ नियम लागू करावा, यासाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांची नुकतीच भेट घेतली. परंतु तरीही तोडगा निघू शकला नाही. विद्यापीठाच्या नियमात तरतूद केल्याप्रमाणे अभियांत्रिकीचा निकाल 30 ते 45 दिवसांत लावणे अनिवार्य आहे. परंतु विद्यापीठाने द्वितीय वर्षाचा, तसेच प्रथम सत्राचा निकाल 100 ते 125 दिवसांनी लावला. हा निकाल 2 महिने उशिराने लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

रिंढे यांनी आमदार राठोड यांची विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली. अधिकार्‍यांनी आश्वासक उत्तरे दिल्यानंतर राठोड यांनी निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थी संघटना व शिक्षणतज्ज्ञांचे मत विचारात घेतले पाहिजे, असे सांगितले. विद्यापीठाने नियम लवचिक केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार राठोड यांनी दिला.


पुणे विद्यापीठाकडून मिळतात एकांगी उत्तरे
परीक्षेचा पुनर्मूल्यांकन अहवाल संबंधित विषयाचा पेपर होऊन गेल्यावर मिळतो. विद्यार्थ्याने परीक्षा देऊनसुद्धा निकालात अनुपस्थित दाखवण्यात येते. ही चूक तत्काळ दुरुस्त करावी. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या निकालात ऑनलाइन पेपरचे गुण दाखवणे, तसेच लेखी पेपरमध्ये शून्य किंवा अनुपस्थित दाखवले जाते. पेपरची छायांकित प्रत मागितल्यावर त्यावर आक्षेप घेता येत नाही. कारण पेपर तज्ज्ञ लोकांनी तपासलेले असतात. त्यामुळे त्यामध्ये चुका असू शकत नाहीत, अशी एकांगी उत्तरे विद्यापीठाकडून मिळतात. परिणामी विद्यार्थ्यांना वर्ष गमवावे लागते. असे असेल, तर फोटोकॉपीचा उपयोग काय?’’ प्रशांत रोकडे, विद्यार्थी.