आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर

8 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

नगर- उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे नुकताच वाहतूक सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यावेळी नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक, तसेच परमिट न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या अँपे व पॅगो रिक्षांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे खवळलेल्या रिक्षाचालकांनी झुंडशाही करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. रिक्षा बंदचे आंदोलनही केले. प्रशासन मात्र याला बधले नाही. त्यामुळे रिक्षाचालकांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतरही त्यांच्यावर दोन-तीन दिवस कारवाई सुरूच राहिली. आता मात्र कारवाईत शैथिल्य आल्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांची नियमबाह्य व मेंढरांसारखी वाहतूक सुरू झाली आहे.

आंदोलनाच्या वेळी परमिट घ्या, असे आवाहन करूनही कोणीही ते घेतले नाही, अशी माहिती समजली. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या नियमावलीत जे आहे, त्याच्या एकाही तरतुदीचे पालन होत नाही. यामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन व चालक यांची पात्रता पाहिली, तर कोणालाच ही वाहतूक करण्याचा परवाना मिळू शकणार नाही, अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या वाहनांतून विद्यार्थी संख्येची क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 नुसार 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्‍या सीटवर 3 विद्यार्थी व तीन आसन क्षमता असणार्‍या वाहनात चार विद्यार्थी इतकीच आहे. प्रत्यक्षात रिक्षात 12 ते 15 विद्यार्थी कोंबले जात आहेत. वर्षानुवर्षे ही वाहतूक कशी सुरू राहते, हा मोठा प्रश्न आहे.

आमची कारवाई सातत्याने सुरूच
स्कूल बस नियमावलीबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांची सातत्याने तपासणी सुरू आहे. गेल्या महिन्यात शंभरपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. विलास कांबळे, आरटीओ.

शाळा दूर असल्याने पर्याय नाही..
रिक्षाचालकांची मनमानी वाढत आहे, पण मुलांना शाळेत जाण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. मुलांच्या शाळेच्या वेळेत शहरबस उपलब्ध नसते. शिवाय वेळही निश्चित नसतो. मुलांना नाइलाजास्तव रिक्षानेच शाळेत जावे लागते.’’ प्रशांत झिने, पालक.

नियम पालनासाठी पालकांची साथ हवी
नियमानुसार वाहतूक झाली, तर प्रवासखर्चात महिन्याला 180 ते 200 रुपये वाढ होईल. त्यासाठी आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल तडजोड करायची का? पालकांनी नियम जाणून घेऊन ते लागू करण्यासाठी प्रशासनाला साथ द्यायला हवी.’’ डॉ. दीपाली फाळके, आम्ही नगरकर.

.. तर आम्ही कारवाईस पात्र राहू
विद्यार्थी वाहतुकीसाठी वाहनात नियमानुसार बदल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी व तोपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी टाटा मॅजिक व व्हॅन चालकांनी लोककार्य व लोकक्रांती दलाच्या माध्यमातून केली आहे. नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनास पिवळा रंग आवश्यक आहे, तसेच चालकांनी त्यातील आसन व्यवस्थेत केलेले बदल पूर्ववत करण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. सध्या परीक्षांचे दिवस असल्याने वाहन बंद राहिल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे बदल एप्रिल महिन्यापर्यंत आम्ही करू, तसे न झाल्यास कारवाईस पात्र राहू, असे प्रतिज्ञापत्रच या चालकांनी तयार केल्याची माहिती हेमंत ढगे यांनी दिली.

शहर बससेवा नावापुरतीच
शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना रिक्षांवर अवलंबून राहावे लागते. शहर बस वाहतूक कधी बंद पडेल याचा भरवसा कोणी देऊ शकत नाही. ही बससेवा सुरू करण्याआधी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ठेकेदार कंपनीने जाहीर केले होते. विद्यार्थ्यांना एक कार्ड दिले जाणार होते. बसमध्ये चढताना विद्यार्थी कार्ड एका यंत्रासमोर धरून आत बसणार होता. बसमध्ये चढल्यानंतर व उतरताना कार्ड यंत्रासमोर धरले की, एसएमएस पालकांच्या मोबाइलवर जाण्याची व्यवस्था होणार होती. मात्र, तसे कधीच घडले नाही. केडगाव, तसेच भिंगारसारख्या उपनगरांत अनेक ठिकाणी बससेवाच नाही. त्यामुळे जनतेला रिक्षाशिवाय पर्यायच उरलेला नाही.


स्कूल बस कशी असावी?

 • वाहनाच्या पुढे व मागे शालेय विद्यार्थ्याचे चित्र असलेला 350 बाय 350 चा बोर्ड रंगवून घ्यावा.
 • स्कूल बस असे लिहिलेले असावे.
 • वाहनाच्या दर्शनी भागावर शाळेचे नाव व त्या वाहनाचा मार्ग क्रमांक लिहिलेला असावा.
 • धोक्याचा इशारा देणारे इंडिकेटर्स बसवणे आवश्यक आहे. हे स्वयंचलित असावे.
 • वाहनाला प्रेशर हॉर्न बसवू नये.
 • वाहनाची संपूर्ण बांधणी लोखंडी धातूची असावी व सर्व बाजू धातूंनी बंद असाव्यात.
 • आसन क्षमता व मान्यता शासन निश्चित करेल.
 • वाहनाची बांधणी बस बॉडीची रचना नियमाप्रमाणे असावी.
 • वाहनचालकाची पात्रता
 • वाहनचालकास 5 वर्षे बस चालवण्याचा अनुभव व तो बॅचप्राप्त प्रशिक्षित असावा.
 • निर्व्यसनी, निरोगी वैयक्तिक स्वच्छता, टापटीपपणा व शुद्ध चारित्र्य असणारा असावा.
 • वाहनचालकाने प्रवासी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे.
 • प्रथमोपचार व अग्निशमनाचे प्रशिक्षण प्राप्त असावा.


वाहनचालकाचे कर्तव्य

 • वाहनाची दैनंदिन देखभाल करावी.
 • वाहनाचे डॅशबोर्डवरील सर्व मीटर कार्यरत असल्याची खात्री करावी.
 • वाहनाची इंधन गळती, ब्र्रेक कार्यक्षमता, टायर्सची स्थिती नियमित तपासावी.
 • बस लेनमधूनच प्रवास करावा.
 • विद्यार्थ्यांची संख्या नोंदणीकृत क्षमता महाराष्ट्र मोटार वाहन नियम 106 मध्ये विहीत केल्याप्रमाणे 12 वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना 2 आसन क्षमता असणार्‍या सीटवर 3 विद्यार्थी व 3 आसन क्षमता असणार्‍या वाहनात 4 विद्यार्थी.
 • वाहनात विद्यार्थ्यांनी विसरलेले सामान शाळेमध्ये जमा करावे.
 • योग्य थांब्यावर व शाळेतील आवारात विद्यार्थी वाहनात घेणे व उतरवणे.
 • परिचर (मदतनीस) आवश्यक
 • प्रत्येक वाहनात परिचर (मदतनीस) असणे बंधनकारक आहे.
 • जर वाहनात विद्यार्थिनी असतील, तर महिला परिचर (मदतनीस) असणे बंधनकारक आहे.
 • विद्यार्थ्यांना उतरताना किंवा चढताना व रस्ता पार करताना वाहतुकीचे नियम पाळून मदत करणे.


वाहन चालवतानाची काळजी..

 • वाहनाचा आरसा सुस्थितीत करावा.
 • सीटबेल्ट/हेल्मेट परिधान करावे.
 • योग्य इशारा करूनच वाहन रस्त्यावर आणावे.
 • चौक पार करताना वेगावर नियंत्रण
 • योग्य मार्गिकेची निवड
 • समोरील वाहनांना प्राधान्य
 • थांबा, पाहा व नंतरच पुढे जाणे आवश्यक
 • वाहनात प्रथमोपचार पेटी व पाच किलोचे एबीसी प्रकारचे 2 अग्निशामक यंत्र बसवावे.
 • वाहनास स्पीड गव्हर्नर बसवणे बंधनकारक.


शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी असलेल्या एकाही नियमाचे सध्या नगर शहरात पालन होत नसल्याचे उघड झाले आहे. रिक्षाचालकांविरोधातील कारवाईची मोहीम पुन्हा थंडावली आहे. त्यामुळे अडलेले पालक व विद्यार्थ्यांना रिक्षाचालकांच्या अरेरावीला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. पालकांची लूट करणार्‍या व विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांवर सातत्याने कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे. तसे झाले तरच विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकतील.

रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे
मुलाला शाळेत सोडणे प्रत्येक पालकाला शक्य होत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांवर भरवसा ठेवावा लागतो. एका रिक्षात अनेक मुले कोंबलेली असतात. प्रत्येक रिक्षाचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.’’ राजू आकुबत्तीन, पालक.