आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी वाहतुकीचा जीवघेणा खेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी शालेय वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही जीवघेणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अद्याप कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. पालकही आपल्या पाल्यांच्या सुरक्षेविषयी बेजबाबदार असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची अशी जीवघेणी वाहतूक धोकादायकच आहे. त्यामुळे लवकरच पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेणार आहेत.
शहरातील रस्त्यांवर विद्यार्थ्यांना कोंबलेल्या रिक्षा दिसतात. या रिक्षा विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी, की त्यांना मृत्यूच्या दारात नेण्यासाठी आहेत, हे समजत नाही. शहरात बहुतांश विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी शाळांमार्फत केली जाते. ही वाहतूक करताना आवश्यक असलेले सुरक्षिततेचे उपाय किंवा नियमांचे पालन केले जात नाही. हजारो विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करून केवळ शाळा प्रशासन आणि रिक्षावाले आपला फायदा बघत आहेत.

शहरात विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी शालेय बस आणि स्थानिक रिक्षांचा वापर केला जातो. मात्र या वाहनांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. ज्या बसेससोबत शाळा विद्यार्थी वाहतुकीसाठी करार करते, त्या बसेसवाल्यांनाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. पण, विद्यार्थ्यांची खासगी वाहूतक करणारे रिक्षावाले अशी कोणतीही जबाबदारी घेताना दिसत नाहीत.

आरटीओने शाळा तसेच स्कूल बसवाल्यांना काही नियम घालून दिले आहेत. यात प्रामुख्याने स्कूलबसच्या खिडक्यांना जाळी असणे आवश्यक आहे. मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच बसच्या खिडक्यांना सुरक्षारक्षक जाळी आहेत. बसमध्ये जेवढ्या सीट आहेत, तितक्याच विद्यार्थ्यांना बसमध्ये घेणे बंधनकारक असते. पण, विद्यार्थ्यांना कोंबून कोंबून बसमध्ये भरले जाते. बसमध्ये प्रथमोपचार पेटी फायर सिलिंडर असणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश बसमध्ये या सुविधा नसतात.

शाळेच्या बसचालकासोबत दोन क्लीनर असणे आवश्यक असते. पण, बहुतांश बसेसमध्ये एकच क्लीनर असतो. बसचालक हा पूर्ण शिक्षित त्याचा फोटो पत्ता शाळेकडे असणे आवश्यक आहे. पण, बहुतांश शाळेकडे ड्रायव्हर किंवा क्लीनरची माहिती नसते. शाळेसाठी वापरण्यात येणाऱ्या बसचा मेंटेनन्स तथा पीयूसी वेळेवर करणे आवश्यक आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक बस भंगाराच्या अवस्थेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या या बस विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षणी मृत्यूच्या दारात नेऊ शकतात.

पालकांनी अशी घ्यावी पाल्याची काळजी...
विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक रोखण्यासाठी कारवाई हा तात्पुरता उपाय असतो. प्रमुख शाळांच्या मुख्याध्यापकांना वारंवार पत्रव्यवहार करून पालकांना आणि आवारात रिक्षाद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांना सुरक्षिततेची जाणीव करून द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनासह पालकांचीदेखील आहे. थोडे पैसे जादा दिले गेले तरी चालेल, पण काटकसर करून रिक्षाचालकांना विद्यार्थी कोंबण्याची परवानगी पालकांनी देऊच नये. शिवाय वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षांवर नियमित कारवाई करणे, अपेक्षित आहेे.'' यशवंत तोडमल, अध्यक्ष, स्मायलिंग अस्मिता

स्कूल बस समित्यांची लवकरच बैठक
रिक्षांमधून चारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे नियमबाह्य धोकादायकच आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरिता प्रत्येक शाळेमध्ये स्कूल बस समित्या नेमलेल्या आहेत. या समित्यांनी यावर काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. पोलिसांनी रिक्षांवर कारवाई केली, तर विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचे कारण पुढे करुन रोष व्यक्त केला जातो. तरीही विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, लौकरच सर्व स्कूल बस समित्यांची बैठक आयोजित करणार आहोत. बैठकीत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याबाबत आवाहन केले जाईल. पालकांनीही त्यादृष्टीने काळजी घेणे अपेक्षित आहे. डॉ.सौरभ त्रिपाठी, जिल्हा पोलिस अधीक्षक.

मोटार वाहन अधिनियमांर्तगत विद्यार्थी वाहतुकीस स्वतंत्र परवाना नसला तरी तीनआसनी वाहतुकीचा परवाना असल्यास रिक्षाचालकांना किमान विद्यार्थी वाहतूक करण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे मारुती व्हॅनला आसनांचा परवाना असल्यास किमान विद्यार्थी वाहतूक करता येते. परंतु, कोंडवाड्याप्रमाणे विद्यार्थी भरून वाहतूक करणे अयोग्यच आहे. अशा रिक्षांवर सहसा तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, दरोरज कारवाई केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याकरिता सहानुभूती म्हणून दंडात्मक कारवाई केली जाते.

एकेका रिक्षातून ते १० शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. काही रिक्षांमधून सुमारे १५ विद्यार्थ्यांची कोंबून कोंबून वाहतूक केली जाते. यात बहुतांश विद्यार्थ्यांचे हात-पाय बाहेर निघालेले दिसतात. विद्यार्थ्यांची दप्तरेही रिक्षाबाहेर लटकत असतात. बरेच रिक्षांमध्ये तर चालकालाही बसायला पुरेशी जागा नसते. चालक सीटवर अर्धवट अवस्थेत बसून रिक्षा चालवतात. वाहनचालकांच्या या जीवघेण्या कसरतीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक, माध्यमिक, इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मारुती व्हॅनचालकांकडून नियम मोडले जातात. वाहतूक पोलिसांसमक्ष हा प्रकार होत असतो. मात्र, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कारवाईत अडचण येते, असे पोलिस सांगतात, तर इंधन दरवाढीचे कारण देत नियमानुसार विद्यार्थी वाहतूक करणे परवडत नसल्याचे रिक्षावाले सांगतात. मुळात इंधन दरवाढीच्या नावाखाली शाळेचे सत्र सुरू होताच पालकांकडून वाढीव शुल्क आकारले जात असल्याचे पालक सांगतात.
बातम्या आणखी आहेत...