आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरीची जागा काँग्रेसला मिळाल्यास मीच उमेदवार- अ‍ॅड. सुभाष पाटील थोपटले दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्यावर आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे गेली, तर राहुरीची जागा काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मीच उमेदवार असेन, दुस-या कुणालाही संधी नाही, असे म्हणत जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत.

वांबोरी येथे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागामार्फत विद्यार्थिनींना सायकली, महिलांना शिलाई मशीनचे वाटप अ‍ॅड. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य एकनाथ ढवळे, सुखदेव कुसमुडे, भाऊसाहेब ढोकणे, भाऊसाहेब गागरे, आर. एस. थोरात आदी उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीला दोन्ही काँग्रेस एकत्रित सामोरे जाणार आहेत. आघाडीच्या जागावाटपात समन्वयातून जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. नगर शहर मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे, परंतु 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नगरची जागा राष्ट्रवादीला मिळावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. त्यावेळी विधानसभा मतदारसंघाची देवाणघेवाण संमतीने करण्यात येईल. नगर शहरात काँग्रेसपेक्षा आमचा उमेदवार उजवा असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेसकडे असलेली नगरची जागा राष्ट्रवादीकडे गेली, तर राहुरी मतदारसंघाची राष्ट्रवादीकडे असलेली जागा काँग्रेसच्या वाट्यावर येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. हाच धागा पकडून अ‍ॅड. पाटील यांनी राहुरी विधानसभेसाठी आग्रह धरला आहे.

अ‍ॅड. पाटील म्हणाले, राहुरी मतदारसंघात जिल्हा परिषदेचे पाच गट काँग्रेसकडे आहेत. वांबोरी गटात काम करत असताना गटाबाहेरही विकासकामे केली. राहुरी मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला जागा मिळाली, तर उमेदवार मीच असेल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामे करू शकतो, तर विधानसभेत संधी मिळाली, तर निश्चित चांगले काम होईल. नगरची जागा राष्ट्रवादीला गेली, तरी ही जागा निश्चित काँग्रेसला मिळेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. विधानसभेसाठी अनुकूल परिस्थिती असून दुस-या कुणालाही संधी नाही, असेही अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत (2009) भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले 57 हजार 380 मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद तनपुरे यांना 49 हजार 47, शिवाजी गाडे यांना 42 हजार 141 मते मिळाली होती. याच निवडणुकीत अ‍ॅड. पाटील अपक्ष उमेदवार होते, त्यांना 14 हजार 484 मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत अ‍ॅड. पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांचे पारडे जड होणार आहे. या मतदारसंघात कर्डिले, प्रसाद तनपुरे, शिवाजी गाडे यांच्यासह अ‍ॅड. पाटील ही दिग्गज मंडळी असल्याने या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

पुन्हा जिल्हा परिषद नाही
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटात तसेच गटाबाहेर विकासकामे केली. आता पुढील काळात पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची नाही. लढायचेच असेल, तर आता फक्त विधानसभेला लढायचे. वांबोरीचा झेंडा विधानसभेत रोवण्याचे माझे स्वप्न असल्याचेही अ‍ॅड. पाटील यांनी यावेळी सांगितले.