नगर- क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला बुधवारी वाडिया पार्क क्रीडा संकुलात सुरुवात झाली. महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
महापालिका व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर जगताप व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी पेनल्टी शूटआऊट करून स्पर्धेला सुरुवात केली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसीम शेख, उपसभापती कलावती शेळके, माजी नगरसेवक निखिल वारे, क्रीडा अधिकारी सावळेराव झिंजुर्के, सहसचिव गोपीचंद परदेशी, परीक्षक रमेश परदेशी, काका शेळके, प्रदीप घाटविसावे, राजेश भालसिंग यांच्यासह खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते.
महापौर जगताप म्हणाले, जिल्हास्तरावर यश संपादन करणा-या संघांची निवड विभागीय व त्यानंतर राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यात या स्पर्धा मोलाची भूमिका बजावतात. आयुक्त कुलकर्णी म्हणाले, या उपक्रमातून यशस्वी खेळाडू निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे.
या स्पर्धेत 21 संघांनी भाग घेतला आहे. 14 वर्षांखालील मुलांचे दहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 17 वर्षांखालील मुलांच्या 8 संघांचा व 17 वर्षांखालील मुलींच्या 3 संघांचा यात समावेश आहे. या स्पर्धेत यशस्वी ठरणा-या संघांना विभागीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.