आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मत: अपंग, पण जिद्दीने ओढतोय झेडपीचा गाडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जन्मत:च दोन्ही हातांना बोटे नव्हती, तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर परीक्षित यादव यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात यश मिळवले. पुढे वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी मार्ग बदलून लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. गटविकास अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी सातारा जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समिती देशात पहिल्या क्रमांकावर आणली. नुकतेच ते नगर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले आहेत.
स्वाक्षरी करण्यासाठी यादव यांना दोन्ही हातांचा आधार घ्यावा लागतो, तथापि, कोणतीही तक्रार करता त्यांनी यशस्वीरीत्या जिल्हा परिषदेचा कारभार चालावला आहे.
सातारा जिल्ह्यात आंबेघर तर्फकुडाळ हे अवघ्या दीड ते दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. यादव हे या गावाचे रहिवासी. वडिलांच्या नोकरीमुळे प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी साताऱ्यात घेतले. जन्मत: दोन्ही हातांना बोटे नसल्याने त्यांना दैनंदिन कामात अडचणी यायच्या. पण त्यांनी या आव्हानाचा स्वीकार करून इच्छाशक्तीच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळवले. बारावीत कोल्हापूर बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला. एकदाही रायटर घेता दोन्ही हातांत पेन धरून सर्व परीक्षा दिल्या. नंतर तीन वर्षे एनआयअायटी संस्थेत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पूर्ण केले.
संगणकीय क्षेत्राची विशेष आवड असल्याने याच क्षेत्रात यशस्वी होण्याचे त्यांचे स्वप्न होते, पण वडिलांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन शासकीय सेवेत जाण्याचा सल्ला दिला. त्या वेळी यादव तीन दिवस रडले, पण वडिलांनी भवितव्य ओळखून हा सल्ला दिला असावा, असं समजून त्यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. लॉसाठीही प्रवेश घेतला होता, पण नंतर लॉचा विचार सोडून दिला.
सन २००० मध्ये एमपीएससीत यश मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गढहिंग्लज पंचायत समितीत यादव रुजू झाले. यशवंत पंचायत राज अभियानात ही पंचायत समिती देशात पहिल्या क्रमांकावर त्यांनी आणली. नंतर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पंचायत समितीलाही सलग तीन वर्षे विभागात द्वितीय क्रमांक मिळवून दिला. आता त्यांची जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. जिल्हा परिषदेचा कारभार करताना एकही फाइल प्रलंबित राहणार नाही, याची विशेष काळजी त्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शी करण्यासाठी तसेच पेपरलेस कामकाजासाठी त्यांचा आग्रह आहे. संपूर्ण कारभारच ऑनलाइन करण्याचा प्रयत्न असल्याचे यादव यांनी सांगितले.
आई-वडिलांमुळेच हे यश
- मुंबईत हातांवर चार-पाचवेळा ऑपरेशन करण्यात आले. आई-वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. वडिलांनी शासकीय सेवेत जाण्याचा दिलेला सल्ला आज मला योग्य वाटतो. माझा लहान भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे.''
परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...