आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५ साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा बिगूल , तीन सहकारी कारखाने प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - संचालक मंडळाची मुदत संपलेल्या व मुदत संपत आलेल्या जिल्ह्यातील आठ सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पाच कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून हरकती मागवण्यात आल्या आहेत. हरकतीनंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर कारखानानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मार्चच्या मध्यापर्यंत निवडणुका पार पाडण्याचे नियोजन साखर सहसंचालक कार्यालयाकडून सुरू आहे.

संगमनेरचा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे, आदिनाथनगर येथील वृद्धेश्वर, सोनई येथील मुळा व भेंडे येथील ज्ञानेश्वर या पाच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. थोरात व विखे सहकारी साखर कारखान्यांच्या प्रारूप मतदारयाद्या १५ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आल्या. २४ जानेवारीपर्यंत प्रारूप मतदारयादीवर हरकती मागवण्यात आल्या आहेत. ३ फेब्रुवारीला हरकतींवर निर्णय घेण्यात येणार असून ७ फेब्रुवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती न आल्यास २८ जानेवारीलाच अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात येईल.

थोरात कारखान्यावर बाळासाहेब थोरात यांचे, तर विखे कारखान्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया सुरू असून सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठीचे प्राधिकरण तयार होण्यास वेळ लागल्याने या कारखान्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.

वृद्धेश्वर व मुळा सहकारी साखर कारखान्याच्या प्रारूप मतदारयाद्या १७ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारीपर्यंत हरकती दाखल करता येतील. हरकतींवर ६ फेब्रुवारीला निर्णय घेण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारूप यादीवर हरकती न आल्यास २ फेब्रुवारीलाच अंतिम यादी प्रसिद्ध होईल. वृद्धेश्वर कारखान्यावर माजी आमदार राजीव राजळे यांचे, तर मुळा कारखान्यावर माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे वर्चस्व पूर्वीपासून आहे.

ज्ञानेश्वर कारखान्याची प्रारूप मतदारयादी मंगळवारी (२० जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आली. २९ जानेवारीपर्यंत यादीवर हरकती मागवण्यात आल्या आहेत. ७ फेब्रुवारीला हरकतींवर निर्णय होणार असून १२ फेब्रुवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती न आल्यास ३ फेब्रुवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. ज्ञानेश्वर कारखान्यावर माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांचे वर्चस्व आहे.

सर्वच कारखान्यांच्या मतदारांनी लेखी अर्जांद्वारे साखर सहसंचालक कार्यालयाकडे विहित मुदतीत हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन भालेराव यांनी केले आहे. ई-मेलवरही हरकती नोंदवता येतील. प्रत्येक कारखानानिहाय ई-मेल पत्ता वेगवेगळा देण्यात आला आहे. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर प्राधिकरणाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. कारखानानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मुदत संपत आलेल्या अशोक, श्रीगोंदे व कुकडी कारखान्यांच्या निवडणूक प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामात जिल्‍हातील १२ सहकारी व ७ खासगी साखर कारखान्यांनी ५४ लाख २५ हजार टन उसाचे गाळप करून ५६ लाख ८० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सर्वाधिक गाळप अंबालिका या खासगी कारखान्याने केले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, हरकतींनंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार