आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालूवर्षी एकरकमी एफआरपी अशक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - साखरेचे पडलेले दर गेल्या वर्षीचा थकीत एफआरपी अदा करताना पडलेला कर्जाचा बोजा यातून यंदाच्या गाळप हंगामात एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे मत जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांनी व्यक्त केले. बँकेकडून उपलब्ध होणाऱ्या रकमेनुसार पहिला हप्ता त्यानंतर साखर विक्रीतून येणाऱ्या रकमेतून दुसऱ्या हप्त्यात एफआरपी देण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात कारखानदारांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
एकाही कारखान्याने गाळपासाठी नेलेल्या उसाचे पैसे अदा करण्यास अद्याप सुरुवात केलेली नाही. साखरेचे उतरलेले दर वाढायला तयार नसल्याने यंदा साखर कारखानदारी अडचणीत आहे. त्यातच गेल्या हंगामातील थकीत एफआरपीमुळे कारखान्यांवर आर्थिक बोजा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य साखर संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कारखानदारांची सोमवारी जिल्हा बँकेत बैठक झाली.

यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारकडून साडेनऊ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक एक टक्का अधिकच्या उताऱ्याला २४२ रुपये एफआरपी जाहीर करण्यात आला आहे. तोडणी वाहतूक वर्ज जाता उर्वरित रक्कम ऊस उत्पादकांना द्यावयाची आहे. कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने, तसेच साखरेचे दर पडलेले असल्याने ही रक्कम एकरकमी देणे अशक्य अाहे, असा सूर बैठकीत व्यक्त झाला.

बँकाकडून उपलब्ध होणाऱ्या कर्जातून जितकी रक्कम देणे शक्य होईल, तितका पहिला हप्ता अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर साखर विक्री अन्य स्त्रोतांकडून उपलब्ध होणाऱ्या पैशातून दुसरा हप्ता देण्यावर बैठकीत एकमत झाले. नियमानुसार पूर्ण एफआरपी द्यायचा, मात्र उपलब्ध होणाऱ्या पैशांतून नियोजन करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. यातून जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना यंदाही एकरकमी एफआरपी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखान्यांकडून किमान दोन त्यापेक्षा अधिक हप्त्यांमध्ये ऊस उत्पादकांना एफआरपी मिळणार आहे. पर्याय नसल्याने हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

अनुदान मिळावे
^साखरेचे दर उतरल्याने कारखाने अडचणीत असून एकरकमी एफआरपी देणे अशक्य आहे. बँकांकडून मिळालेल्या कर्जातून अधिकाधिक रक्कम देण्याचा प्रयत्न करू. साखरेचे दर वाढल्यास फारशी अडचण येणार नाही. मात्र, तोपर्यंत सरकारने एफआरपी अदा करण्यासाठी कारखान्यांना अनुदान सवलती देण्याची आवश्यकता आहे.'' शिवाजीराव नागवडे, राज्यसाखर संघ.

२५ लाख क्विंटल साखर
यंदाच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील १२ सहकारी खासगी अशा एकूण १८ साखर कारखान्यांनी २५ लाख ४४ हजार टन उसाच्या गाळपातून २४ लाख ९९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन आतापर्यंत केले आहे. या हंगामात ८० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपलब्ध उसापैकी एक तृतीयांश उसाचे गाळप झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...