आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तर 18 लाख ऊसतोड मजूर परराज्यात जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ऊसतोडणीच्या दरात वाढ करावी, या मागणीसाठी राज्यातील 18 लाख मजुरांनी 26 जुलैपासून संप सुरू केला आहे. मंगळवारी चौथ्या दिवशीही तोडगा न निघाल्याने संप चिघळण्याची चिन्हे आहेत. तोडगा न निघाल्यास राज्यातील 18 लाख मजूर कर्नाटक, तामिळनाडू व गुजरातमध्ये जातील.
नगर व बीड हे ऊसतोड मजुरांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या दोन जिल्ह्यांत तब्बल चार लाखांहून अधिक मजूर आहेत. जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद या भागातही मोठ्या संख्येने ऊसतोडणी मजूर आहेत. राज्यातील एकूण संख्या 18 लाख आहे. राज्यात खासगी 54 कारखाने, तर सहकारी 176 साखर कारखाने आहेत. त्यापैकी यंदा 45 खासगी व 140 सहकारी कारखाने सुरू होणार आहेत. कारखान्यांचा गळीत हंगाम ऊसतोड मजुरांवर अवलंबून असतो. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांमध्ये बीड, नगरसह अन्य जिल्ह्यांतील मजूर मोठ्या प्रमाणात जातात.
यंदा गळीत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच ऊसतोड मजुरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. साखर संघ व ऊसतोडणी कामगार संघ यांच्यात 15 आॅक्टोबर 2011 रोजी करार झाला होता, त्याची मुदत संपली आहे. सध्याचा दर मजुरांना परवडत नाही. दरात दुप्पट वाढ करावी, वाहतुकीच्या दरात वाढ करावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनच्या वतीने अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली संप सुरू करण्यात आला आहे. राज्यातील 18 लाख मजूर या संपात सहभागी झाले आहेत. संपाला माजी आमदार दगडू पाटील बडे, केशवराव आंधळे व फुलचंद कराड यांनी पाठिंबा दिला आहे. ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नांबाबत राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते यांच्याशी चर्चा झाली. मात्र, सकारात्मक तोडगा न निघाल्याने संप सुरू केला. लवकरच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. तोडगा निघाला नाही, तर मजूर कर्नाटक, तामिळनाडू व गुजरातमध्ये जातील, असे थोरे यांनी सांगितले.

लवादावर पंकजा मुंडेंची निवड करण्याचा ठराव
ऊसतोडणी मजुरीत दरवाढ, तसेच अन्य प्रश्नांवर यापूर्वी शरद पवार व खासदार गोपीनाथ मुंडे यांचा लवाद होता. मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लवादावर आमदार पंकजा मुंडे यांची निवड करावी, असा ठराव राज्य वाहतूक मुकादम, कामगार युनियनच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसे पत्र युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी राज्य सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते यांना दिले आहे.

दोन हजार कोटींचा फरक थकवला
ऊसतोडणी मजुरांनी यापूर्वी सहावेळा संप केला होता. प्रत्येक वेळी साखर कारखानदारांनी फरक देण्याचे जाहीर केले. मात्र, करारानुसार पूर्ण फरक दिलेला नाही. कारखानदारांनी सुमारे 2 हजार कोटींचा फरक थकवला आहे. या फरकातून मुकादमांना देण्यात येणारे 17 टक्के कमिशनही दिलेले नाही.’’ गहिनीनाथ थोरे, अध्यक्ष, ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन.