आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊसरोपांमुळे होणार सव्वाशे कोटींचा फायदा; लागवडीच्या बदलत्या तंत्रात ‘आत्मा’चा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उसाची पारंपरिक लागवड टाळून नवीन पद्धतीने लागवड केल्यास जिल्ह्याचा सव्वाशे कोटींचा फायदा होईल. पाणी व उसाच्या बचतीतून हे साध्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आत्मा प्रकल्पांतर्गत यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील तीन हजार शेतकर्‍यांनी लाभ घेतला.
आत्मा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 17 ते 24 जूनदरम्यान 14 तालुक्यांत ऊसरोपे तयार करण्याची 15 प्रात्यक्षिके घेण्यात आली. तीन हजार शेतकर्‍यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. उसाची रोपे गादी वाफ्यावर, प्लास्टिक ट्रेमध्ये, 4 व 6 इंची प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कशी करावीत, याचे प्रात्यक्षिक रावसाहेब गरदाडे यांनी शेतकर्‍यांना दाखवले. फक्त 250 उसांचा वापर करून 5000 रोपे तयार करण्याचे हे तंत्र आहे. प्लास्टिक ट्रेमध्ये किंवा 4 इंची प्लास्टिक पिशवीत वाळू, शेणखत, कोकोपीट वापरून अत्यंत कमी खर्चात ही रोपे 3 ते 4 आठवड्यांत तयार होतात. 9 ते 12 इंचांपर्यंत या रोपांची वाढ होते. ओळीत 5 व रोपांमध्ये 2 फुटांवर लागवड केल्यास एकरी 4,450 रोपांची गरज भासते. यातून 2 किलो वजनाचा ऊस निर्माण झाल्यास एकरी 90 ते 100 टन उत्पन्न मिळू शकते. प्रात्यक्षिकानुसारच्या लागवडीत बाविस्टीन, डायमिथोएट, पी. एस. बी. व स्फुरदाची 25 टक्के बचत होते.

सप्तधान्य किंवा ताग, ढेंचा ही हिरवळीच्या खताची पिके फुलोर्‍यादरम्यान जमिनीत गाडून जमिनीचा पोत सुधारता येतो. यातून निर्माण होणारा सेंद्रिय कर्ब 1 टक्क्यापर्यंत असणे आवश्यक आहे. बटाटा, कांदा, कोबी, फ्लॉवर सारखी आंतरपिके हंगामानुसार घेतल्यास ऊस उत्पादनाचा खर्चही यातून निघणार आहे.

जिल्ह्यात किमान 70 हजार हेक्टरवर हे तंत्रज्ञान वापरल्यास 3000 एकरांवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकेल. बेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या उसाच्या गाळपातून 60 कोटींचे उत्पन्न वाढेल. रोपांच्या लागवडीमुळे सर्व क्षेत्राला पाणी देण्याची गरज भासणार नाही. यातून 70 हजार हेक्टर क्षेत्राचे 2 पाणी वाचणार आहेत. हे पाणी कपाशी, सोयाबीन, मका पिकाखालील 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रास वापरता येईल. उपलब्ध पाण्यातून 70 कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न वाढेल.

सध्या जिल्ह्यातील एक लाख आठ हजार हेक्टर क्षेत्र उसाच्या लागवडीखाली आहे. नवीन तंत्रामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच एकरी उत्पादनात वाढ होणार आहे. अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न आत्मामार्फत सुरू आहे.
शेतकरी स्वत: रोपे तयार करणार आहेत. गरजेपुरती रोपे वापरून इतर रोपे विकतील. काही गावांत शेतकरी गटांमार्फत रोपे तयार केली जाणार आहेत. काही सुशिक्षित बेरोजगार स्वत: 5 ते 10 लाख रोपे तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. यातून 20 ते 25 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करू शकणार आहेत. शेतकर्‍यांच्या हितासोबतच व्यवसाय म्हणूनही या तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात शंभर लाख टनांचे उद्दिष्ट
४सध्या जिल्ह्यात नवीन लागवडीतून 56 लाख टन ऊस उपलब्ध होतो. नवीन लागवडीतून किमान 70 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. 45 हजार हेक्टरवरील खोडवा लक्षात घेता यावर्षी 100 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यासाठी 1400 एकर क्षेत्रावर रोपाद्वारे ऊस लागवड प्रात्यक्षिकासाठी शेतकर्‍यांना 56 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.’’ संभाजी गायकवाड, प्रकल्प उपसंचालक, आत्मा.
या ठिकाणी झाले शेतकर्‍यांचे प्रशिक्षण
काष्टी (श्रीगोंदे), रुईगव्हाण (कर्जत), गुणोरे (पारनेर), नांदगाव (नगर), दहिगावने (शेवगाव), देडगाव (नेवासे), कोल्हेवाडी (संगमनेर) कळस (अकोले), लोणी (राहाता), धामोरी (कोपरगाव), गुजरवाडी, अशोकनगर (श्रीरामपूर), आरडगाव (राहुरी), चितळी (पाथर्डी) व कुसडगाव ( जामखेड) या ठिकाणी झालेल्या प्रशिक्षणाला शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
(फोटो - संग्रहित फोटो)