Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | sugarcane labour issue

ऊस कामगारांची फिरती पंढरी

प्रतिनिधी | Update - Oct 21, 2011, 09:21 AM IST

बेलापूर ही ऊसतोडणी कामगारांची फिरती पंढरीच. सर्वप्रथम बेलापूरचा साखर कारखाना सुरू झाल्याने ऊसतोडणीसाठी जाणाऱया मजुरांच्या ओठी ‘बेलापूर’ हाच शब्द रूढ झाला आहे.

 • sugarcane labour issue

  शेवगाव - बेलापूर ही ऊसतोडणी कामगारांची फिरती पंढरीच. सर्वप्रथम बेलापूरचा साखर कारखाना सुरू झाल्याने ऊसतोडणीसाठी जाणाऱया मजुरांच्या ओठी ‘बेलापूर’ हाच शब्द रूढ झाला आहे. कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जायचे असले तरी ‘बेलापूर’ला जायचे असेच सांगतात.
  शेवगाव तालुक्यातील खानापूर मुंगी, हातगाव कांबी परिसरात ऊसतोडीला सुरुवात झाली असून तोडणी कामगार त्या ठिकाणाी जमू लागले आहेत.
  आज येथे उद्या तेथे रोज नव्या ऊस थकीत चटईची कोपी करून संसार थाटायचा, थळ तोडणे संपले, की परत तेथून कोपी मोडायची व दुसरीकडे नवा संसार सुरू करायचा हेच त्यांचे सहा महिन्यांचे जीवनचक्र. विविध जाती-धर्माचे हे सगळे कामगार एका कुटुंबात आल्यासारखे राहतात.
  मुलाच्या हाती कोयता
  सकाळचा गार वारा अंगाला झोंबत असताना मुलांसाठी शेकोटी पेटवून भल्या पहाटे कोयता हातात घेऊन उसाबरोबर युद्ध खेळत काम उरकत चालायचे. घाईघाईत ऊस तोडणारा कोयता चुकून अंगाला कधी जखमा करतो, तर उसावर असलेल्या मोहळाची माशी अंगाचा चावा घेते. सळसळत एखादा नाग, सापही पायाखालून निघून जातो. रोज संध्याकाळी सुटकेचा नि:श्वास सोडत चटणी-भाकरीचा आनंद घ्यायचा, अन्न पोटात जाते न जाते तोच मुकादमचा गाडी भरण्याचा आवाज आला की ताबडतोब कोयता हात घेऊन पाळायचे.
  अंगारावरील जखमा ओल्या
  ऊसतोडणी सुरूझाल्यामुळे उसाच्या पाचरटाने अंग कापायला सुरुवात झाली आहे. सगळ्या अंगावरील जखमा ओल्या आहेत. घरची आठवण होते. नकळत डोळे ओलावतात. पण थोड्याच दिवसांत जखमांवर खपल्या येतील. सवय होत जाईल.
  पोटासाठी भटकंती
  पोटासाठी सहा महिने गाव सोडून अतिकष्टाची ही भटकंती असते. सगळा संसार आपल्या बैलगाडीला बांधलेला, खोपीसाठी चटया, चुलीसाठी चार विटा, दोन-चार, डबे, मोठी पेटी, दोन ताट, चार कप, अंथरायला घोंगडी, एखादी गाय, शेळी व चिमुकली मुले, सध्या वाढे विकूनच आलेल्या पैशातून तेल-मीठ चालू आहे. चिमुकली मुले, आईच्या उसाच्या मोळ्या बांधण्यास मदत करतात. त्या मुलांनाही उसाच्या गोडीबरोबर खपटाच्या किंवा पायात मोडलेल्या काट्यामुळे वेदना सहन कराव्या लागतात.

Trending