आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरांची मते ठरणार निर्णायक, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मजुरांच्या मतांसाठी मोर्चेबांधणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व मनसे अशी पंचरंगी लढत होत आहे. या मतदारसंघातील ऊसतोड मजुरांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या मतांसाठी उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आमदार चंद्रशेखर घुले पुन्हा रिंगणात आहेत. काँग्रेसकडून अजय रक्ताटे, मनसेकडून देवीदास खेडकर, राष्ट्रवादीकडून चंद्रशेखर घुले, शिवसेनेकडून बाबासाहेब ढाकणे, भाजपकडून मोनिका राजळे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
शेवगाव व पाथर्डी हे ऊसतोड मजुरांचे तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांत 3 लाख 10 हजार 405 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाखांहून अधिक मतदार हे ऊसतोडणी मजूर आहेत. ऊसतोड मजुरांच्या मतांवर या पाच दिग्गज उमेदवारांचा डोळा आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा प्रचार करणारे आमदार चंद्रशेखर घुले हे आता राजळे यांची पत्नी मोनिका यांच्या विरोधात उभे आहेत. घुले यांच्यासमोर भाजप, शिवसेना व मनसे या पक्षांतील उमेदवारांचे तगडे आव्हान आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत घुलेंसमोर अपक्ष उमेदवार राजीव राजळे व भाजपचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचे आव्हान होते.
दिवाळीनंतर ऊसतोड मजूर हे कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, चाळीसगाव, सांगली, फलटण, सातारा या जिल्ह्यांत ऊसतोडीसाठी जातात. यंदा दिवाळीपूर्वी निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीत गावांंमध्येच मजूर असतील. यापूर्वीच्या निवडणुकीत मतदानासाठी मजुरांना ऊसतोडणीच्या ठिकाणाहून गावी यावे लागत असे. आता हे मजूर गावीच असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश मजूर वंजारी समाजातील आहे. वंजारी समाजाची मते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपची आहेत. आमदार पंकजा मुंडे यांच्यामुळे वंजारी समाजाची मते भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांना मिळण्याची शक्यता असली, तरी देवीदास खेडकर (मनसे), बाबासाहेब ढाकणे (शिवसेना) हे दोन उमेदवार वंजारी समाजाचेच असल्यामुळे मतांची विभागणी होणार आहे.