आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुल्ताना चांदबिबीवरील ग्रंथाचे 18 जुलैला प्रकाशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सुल्ताना चांदबिबीच्या अद्वितीय कर्तृत्वाची गाथा असलेला संदर्भ ग्रंथ 18 जुलैला प्रकाशित होणार आहे. डॉ. शशी धर्माधिकारी (फ्रान्स) यांनी लिहिलेल्या नगरच्या दीक्षा पब्लिकेशनच्या या पुस्तकाचे प्रकाशन उद्योगपती डी. एस. कुलकर्णी (पुणे) यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात सायंकाळी 6 वाजता होत आहे. या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ करणार आहेत.

सोळाव्या शतकाच्या अखेरीस मोगलांनी नगरवर केलेल्या आक्रमणांच्या वेळी जीवाची पर्वा न करता तिने हे राज्य वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. तिच्या शौर्य आणि मुत्सद्देगिरीचा साक्षीदार नगरचा भुईकोट किल्ला आहे.

मागील आठ वर्षे डॉ. धर्माधिकारी यांनी संशोधन करून या पुस्तकाचे लेखन केले आहे. चांदबिबीविषयीची जेथे माहिती मिळेल, तेथे ते जाऊन आले. विजापूर, हैदराबाद, तसेच इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, तसेच अन्य देशांमधील अशा अनेक ठिकाणच्या संग्रहालयांना, ग्रंथालयांना भेटी देऊन त्यांनी महत्त्वाचे संदर्भ गोळा केले. चांदबिबीच्या कर्तृत्वाचे अंधारात राहिलेले अनेक पैलू डॉ. धर्माधिकारी यांनी उजेडात आणले आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ‘डेक्कन पेंटिंग्ज’ म्हणून जगभर नावाजली गेलेली चांदबिबीची व निजामशाहीतील तीस चित्रे डॉ. धर्माधिकारी यांनी या ग्रंथात दिली आहेत.

या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक (कै.) सुरेश जोशी व नगरच्या सर्व इतिहासप्रेमींची मदत झाली. येत्या 18 ला सायंकाळी 6 वाजता सहकार सभागृहात होणार्‍या विशेष समारंभात ज्येष्ठ उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर उपस्थित असतील. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे यावेळी डीएसकेंशी संवाद साधतील. नगरच्या साहित्यिकांची शब्बीर शेख यांनी तयार केलेली सूचीही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे उदय एजन्सीजचे वाल्मिक कुलकर्णी यांनी सांगितले.