आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांचा प्रवास होणार सुखकर, अकरा नव्या बस सेवेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या ११ बसेसचा प्रारंभ करताना सुनील तटकरे. छाया: उदय जोशी - Divya Marathi
नव्या ११ बसेसचा प्रारंभ करताना सुनील तटकरे. छाया: उदय जोशी
नगर - नगरकरांचाप्रवास सुखकर करण्यासाठी शहर बससेवेच्या ताफ्यात रविवारी नव्या ११ गाड्या दाखल झाल्या. पूर्वीच्या १० आण‍ि नव्‍याने दाखल झालेल्‍या बसच्या माध्यमातून शहरातील प्रवासी सेवा अधिक सुखकर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते रविवारी नव्या गाड्या समारंभपूर्वक सुरू करण्यात आल्या.

गेल्या सहा महिन्यांपासून यशवंत ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून शहरात बससेवा सुरु आहे. सुरवातीला दहा बसगाड्यांच्या माध्यमातून ही सेवा शहरात सुरु झाली. जानेवारीला नगरकरांच्या सेवेत बससेवा दाखल झाली. अभिकर्ता संस्थेकडून सेवेसाठी
वापरण्यात येणाऱ्या दहा बस प्रवाशांच्या वाढत्या संख्येपुढे अपुऱ्या ठरत हाेत्या. करारनाम्यानुसार शहर बससेवेत अभिकर्ता संस्थेकडून आणखी ११ गाड्यांची वाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार यशवंत ऑटोकडून आणखी ११ गाड्या सेवेत दाखल करण्यात आल्या.
रविवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या हस्ते नारळ फोडून नवीन ११ बसच्या सेवेला प्रारंभ करण्यात आला. या वेळी आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णा कोतकर, सभागृह नेते कुमार वाकळे, नगरसेवक कैलास गिरवले, आरिफ शेख, संपत बारस्कर, सविता कारळे, अजिंक्य बोरकर, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, अशोक बाबर, सोमनाथ धूत, संभाजी पवार, परिमल निकम, निखिल वारे, जितू गंभीर, अभिजित खोसे, किसन लोटके, बससेवा अभिकर्ता धनंजय गाडे, विनीत गाडे, बाबू चोरडिया आदींसह नागरिक उपस्थित होते.
तटकरे यांनी बससेवेला शुभेच्छा दिल्या. महापौर कळमकर यांनी तटकरे यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, शहरात मनपाच्या वतीने चांगली बस सेवा देण्यात येत आहे. नव्या ११ बस सुरू झाल्याने अधिक चांगली सेवा देता येईल. ही बससेवा शहराबरोबरच भिंगार, सावेडी, एमआयडीसी परिसरात रात्री उशिरापर्यंत देण्यात यावी, जेणे करून नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
महापौर कळमकर म्हणाले, बससेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बसची संख्या वाढून फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती. तशा सूचना अभिकर्ता कंपनीस दिल्या होत्या. त्यानुसार नव्याने ११ बस मिळाल्याने चांगली जलद सेवा देता येणार आहे.
महिलांसाठी बस
मुंबईच्या धर्तीवर महिलांसाठी विशेष बस सुरू करण्याचा मानस आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. हा विचार प्रत्यक्षात उतरल्यास अशा पद्धतीची शहर बससेवा देणारे नगर हे राज्यातील पहिले शहर ठरेल. प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार आमदार जगताप यांचा मानस प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न अभिकर्ता कंपनीकडून होण्याची शक्यता आहे.
मनमानीला चाप
प्रसन्नपर्पलची बससेवा बंद झाल्यानंतर पॅगो रिक्षाचालकांची मनमानी वाढली होती. जानेवारीमध्ये यशवंत आॅटोकडून बससेवेला प्रारंभ झाल्यानंतर ही मनमानी काही प्रमाणात कमी झाली. बसच्या अपुऱ्या संख्येमुळे गेली सहा महिने रिक्षाचालकांची मनमानी सुरूच होती. आता बससोबतच फेऱ्यांची संख्या वाढल्याने रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांना उपयुक्त
शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शहर बससेवा वरदान ठरली आहे. रिक्षाचालकांना अधिक पैसे देऊन गर्दीत शाळा, महाविद्यालयात जावे लागत होते. मात्र, आता बसेसची संख्या वाढल्याने अधिक चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा आहे.'' - शुभमलोढा, विद्यार्थी.
कालावधी वाढवावा
शहरबससेवेकडून चांगली सेवा मिळाली. आता नव्याने दाखल झालेल्या बसच्या माध्यमातून फेऱ्या वाढवाव्यात, तसेच रात्री उशिरापर्यंत नागरिकांना या सेवेचा लाभ मिळावा. बाहेरून उशिरा शहरात येणाऱ्या लोकांना याचा फायदा मिळेल.'' - सिंधूदरंदले, निवृत्तशिक्षिका.