आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोविकलांग महिलांना मिळाला खरा 'आधार'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - 'दुरितांचे तिमिर जाओ' या ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानातील ओवीचा अंगीकार करून वंचितांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचे माउली सेवा प्रतिष्ठानचे काम जिल्ह्यातील संत परंपरेला साजेसे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
प्रतिष्ठानमध्ये कायम वास्तव्याला असलेल्या, मनोविकारातून विविध व्याधींमधून सुधारत स्वत:च्या पायावर उभा रहात असलेल्या महिला प्रतिष्ठानमध्ये जन्मलेल्या मुलांना आधार कार्डचे वाटप करताना ते बोलत होते.

नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे माउली प्रतिष्ठानमध्ये सध्या शंभर महिला त्यांची १५ मुले वास्तव्याला आहेत. त्यापैकी ८५ महिला १५ मुलांची आधार नोंदणी करून त्यांना नवीन ओळख देण्याचे काम शासकीय पातळीवर करण्यात आले. नगरचे तहसीलदार सुधीर पाटील, भूसंपादन उपविभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. कुटुंब, गाव स्वत:चीही ओळख हरवलेल्या या महिलांना माउलीमध्ये हक्काचे घर मिळाले आहे.
वंचितांच्या दुर्धर व्याधींवर उपचार मिळाले, पण त्यांना माणूस म्हणून शासकीय पातळीवर कुठलीही ओळख नव्हती. त्यांना अधिकृत ओळख देण्याचे काम या निमित्ताने तहसीलदार पाटील यांनी केले. त्यासाठी आधार नोंदणी टीम दोन दिवस माउलीमध्ये तळ ठोकून होती. अशा प्रकारे ओळख हरवलेल्या महिलांना आधार कार्ड देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आधार कार्ड स्वीकारण्यासाठी माउलीतील महिला नटून थटून बसल्या होत्या. त्यांनी मोठ्या उत्साहात औक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी कदम, तहसीलदार पाटील, बलभीम पठारे, मेघमाला पठारे, न्यू आर्टस् मधील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसंत देसले, राजकुमार आघाव, उपसरपंच सुनील जाधव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र सुचेता धामणे यांनी आभार मानले.
अन् डोळे पाणावले
माउलीने आमच्या जीवनाला आधार दिला, पण सरकारी पातळीवर या नोंदणीमुळे आम्हाला जगण्याचे आत्मभान मिळाले, असे भावनिक उद्गार मंगलाताईंनी काढले. आपण सगळे आपल्या ओळखीसाठी धडपडतो. पण माणूस म्हणून या देशाचे नागरिक म्हणून अशी अधिकृत ओळख मिळते, ही ऐतिहासिक घटना आहे, असे मोनिका साळवी म्हणाल्या.