आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थग‍ितीने जायकवाडीत येणारे पाणी थांबले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर/मनमाड - जायकवाडीच्या वरील भागातील धरणांमधून मराठवाड्यासाठी पुरेसे पाणी सोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. नगरच्या महापौर शीला शिंदे यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने स्थगिती देताच भंडारदरा व मुळा धरणातून 11 दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग थांबवण्यात आला. 28 एप्रिलला सोडलेले हे पाणी जायकवाडीत आलेच नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी 18 जून रोजी होणार आहे.


मराठवाडा जनता विकास परिषदेच्या याचिकेवरून खंडपीठाने 24 एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यावरील शासनाची फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर 28 एप्रिल रोजी मुळा धरणातून 200, तर भंडारदरा धरणातून 1500 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला.


महापौर शिंदे यांनी 6 मे रोजी सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर राज्य शासनाने मंगळवारी बाजू मांडली. जायकवाडीत जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असून, नगरच्या धरणांतून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचे शासनाने म्हटले होते. त्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेशाला स्थगिती दिली.


पाणी आलेच नाही
मुळा व भंडारदरातून सोडलेले पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचू शकले नाही. उलट दोन्ही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा घटला. भंडारद-याचे पाणी जायकवाडीपासून 45, तर मुळाचे 38 कि.मी. दूर आहे.