आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदी करामतीतून साकारतात आगळ्या कलाकृती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सुप्रिया सुमतीलाल कोठारी सध्या सीए करते आहे, पण आज तिची ओळख आहे "पेपर पर्ल्स'ची निर्माती म्हणून. कागदाच्या वेगवेगळ्या करामतीतून ती साकारत असलेल्या शुभेच्छापत्रांची सध्या महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये चांगलीच क्रेझ आहे.

लहानपणापासूनच सुप्रियाला चित्रकलेची आवड आहे. तिचं हस्ताक्षर सुंदर. जिल्हा राज्य पातळीवरील चित्रकला स्पर्धेतील अनेक बक्षिसं तिने पटकावली. तथापि, नंतर तिने कोणत्याही संस्थेत कलाविषयक शिक्षण घेतलं नाही. घरच्या घरीच तिने कलासाधना सुरू ठेवली.

सोळा वर्षांची असताना तिने स्वत: २५ मुलांसाठी चित्रकलेचा प्रशिक्षण वर्ग घेतला. नंतर सुप्रिया पावडर शेडींग आणि पेपर आर्टकडे वळली. कागदाच्या घड्या घालून, वेगवेगळे प्रयोग करून ती कलाकृती तयार करू लागली.

२०११ मध्ये सुप्रियाने तिच्या कलाकृतींचे पहिले प्रदर्शन अर्बन बँकेजवळील बार्शीकर बिल्डिंगमध्ये केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी तिने नगर कॉलेजच्या प्रदर्शनात स्टॉल घेतला. अनेक युवक-युवतींना सुप्रियाने तयार केलेली शुभेच्छापत्रे आवडली. विशेषत: कागदाचे वेगवेगळे आकार कापून तयारी केलेली घडीची ग्रीटिंग्ज लोकप्रिय झाली. मागील महिन्यात झालेल्या सुप्रियाच्या तिसऱ्या प्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

एम. कॉम. केल्यानंतर सीएचा अभ्यास करताना सुप्रिया अनेक गोष्टी करते आहे. टॅटूची डिझाइन्स ती तयार करून देते. मागणीनुसार कॉम्प्युटराइज ग्रीटिंग्ज तयार करून देते. पेपर पर्ल्स तयार करण्यासाठी लागणारा विशेष प्रकारचा कागद ती कोल्हापूर, सांगली येथून मागवते. त्याशिवाय जुन्या निमंत्रण लग्नपत्रिकांचाही वापर ती करते. मध्यंतरी आयएसडीटी संस्थेत तिने प्रशिक्षण वर्ग घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

या कलेच्या क्षेत्रातच करिअर करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी ती अॅनिमेशन शिकून घेणार आहे. भविष्यात सीएच्या ज्ञानाला अॅनिमेशनची जोड देऊन काही वेगळे करण्याचीही सुप्रियाची मनस्वी इच्छा आहे.