आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रंगी सारी गुलाबी चुनरीया रे’ने जिंकली मने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मोहे मारे... मारे मारे नजरीया सावरीया...
आंतरराष्ट्रीयख्यातीच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेल्या या गीताने नगरकर रसिकांना शनिवारी रात्री मंत्रमुग्ध केले. दैनिक दिव्य मराठी, पुणे येथील व्हायोलिन अॅकॅडमी नगर येथील सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने नंदनवन लॉन येथे स्वरझंकार मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कौशिकी यांच्या गायनाबरोबरच व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या बहारदार व्हायोलिन वादनाने रसिकांची दाद मिळवली. ‘दिव्य मराठी’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे गुलाबी थंडीत रंगलेली ही सुरेल मैफल रात्री साडेदहापर्यंत सुरू होती. ख्यातनाम गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुमधूर सुरांची मैफल प्रथमच ऐकण्याची संधी नगरकरांना यानिमित्ताने उपलब्ध झाली. लातूर येथील ज्येष्ठ तबलावादक पंडित शांताराम चिगरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रारंभी पं. उपाध्ये यांचे व्हायाेलिन वादन झाले. कर्नाटकी शैलीतील राग चारुकेशी, रूपक त्रितालमधील बंदिशी, सावरे ना जईयो, तसेच पंडित भीमसेन जोशी यांचे ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ही गीते त्यांनी व्हायोलिनवर सादर करून रसिकांची मने जिंकली. उपाध्ये यांना तबल्यावर पंडित मुकेश जाधव व्हायोलिनवर तेजस उपाध्ये यांनी दिलेल्या साथीमुळे मैफलीची रंगत वाढत गेली.

रसिकांना प्रतीक्षा होती, ती कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुमधूर सुरांची. मैफलीच्या दुसऱ्या सत्रात कौशिकी यांचे गायन सुरू झाले, तेव्हा सभागृहाचा नूरच पालटला. ‘दे आज रे’ या शाम कल्याण रागाने कौशिकी यांनी गायनास सुरूवात केली. शाम छबी मन मोहलियो, निंद आवत, तसेच रंगी सारी गुलाबी चुनरीया रे... या रचनांनी रसिक अक्षरश: मंत्रमुग्ध झाले. कौशिकी यांनी घेतलेल्या आलाप तानांनी गुलाबी थंडीतील या मैफलीस साज चढत गेला. मैफलीच्या शेवटी त्यांनी सादर केलेल्या ‘सुंदर ते ध्यान’ या मराठी अभंगाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यांना हार्मोनियमवर नगर येथील प्रसिद्ध कलावंत तन्मय देवचके, तबल्यावर पंडित मुकेश जाधव यांनी, तर तानपुऱ्यावर प्राची पाठक मेघदीपा गांगुली यांनी साथ केली.

मैफल संपल्यानंतर कौशिकी यांना पाहण्यासाठी रसिकांनी एकच गर्दी केली. या सुरेल मैफलीचे आयोजन केल्याबद्दल ‘दिव्य मराठी’चे रसिकांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिव्य मराठीसह सरगमप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाडे, राम शिंदे, सुनील चिटणीस, विश्वास जाधव, महेश कुलकर्णी, महेश लेले, दत्तात्रय साबळे, विश्वास जाधव, डॉ. जयंत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. पु. ना. गाडगीळ हे मुख्य प्रायोजक, तर बँक ऑफ महाराष्ट्र सहप्रायोजक होते. हॉटेल आयरिश हॉस्पिटॅलिटी प्रायोजक होते.

दैनिक दिव्य मराठीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख महेश देशपांडे यांनी दिव्य मराठीचे ब्यूरोचिफ मिलिंद बेंडाळे यांचा पुस्तक देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्याच्या वीणा गोखले यांनी केले.
पु. ना. गाडगीळ खरेदी-उत्सवाची सोडत मनश्री दिनेश डेंगळे आर्य योगेश हराळे या लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आली. वैशाली सावंत सुरेखा कोळी यांना बक्षीस म्हणून मोटारसायकल मिळाली. पं. उपाध्ये यांच्या हस्ते कोळी यांना दुचाकीची चावी देण्यात आली. समवेत पु. ना. गाडगीळचे शशांक बरिदे, पीयूष भंडारी.
बातम्या आणखी आहेत...