आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची 'कावीळ' नागरिकांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या काही महिन्यांपासून कावीळग्रस्त अवस्थेत असलेल्या महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका अखेर नागरिकांना बसला. सुस्तावलेल्या प्रशासन व सत्ताधार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे सुमारे चारशे नागरिकांना जलजन्य आजारांची लागण झाली आहे. त्यापैकी सव्वाशे नागरिकांना काविळीची लागण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही दूषित पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पाणी पुरवठा विभागाच्या अवकृपेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आजाराची लागण होऊन चार दिवस उलटल्यानंतर महापौर संग्राम जगताप व संबंधित अधिकार्‍यांनी याची दखल घेतली.
प्रभाग २७ मधील आगरकर मळा, आनंदनगर, गजानन कॉलनी, स्मृती कॉलनी, शिवनेरी चौक, मल्हार चौक आदी भागात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्याबाबत तातडीने कार्यवाही करा, अशी तक्रार नगरसेवक अनिल शिंदे व नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे वारंवार केली. परंतु निर्ढावलेल्या अधिकार्‍यांनी सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली, तसेच जलजन्य आजारांची लागण झालेल्या रुग्णांना मोफत औषधवाटप सुरू केले. दरम्यान, आमदार अनिल राठोड यांनीही बुधवारी दुपारी परिसराची पाहणी केली. राठोड यांनी पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्यासह आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूकर यांनाही पाहणीसाठी बोलावले होते, परंतु परिस्थिती गंभीर असूनही जबाबदार अधिकारी निकम तिकडे फिरकले नाहीत. राठोड पाहणीसाठी येणार असल्याचे समजताच महापौर संग्राम जगताप यांनीदेखील पाहणीसाठी मोर्चा वळवला. राठोड व जगताप यांनी पाहणी केली असली, तरी सुस्तावलेल्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती अजूनही गंभीर आहे. दोन दिवसांपासून परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांना टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. परंतु ज्यांना जलजन्य आजाराची लागण झाली त्या शेकडो नागरिकांचे आरोग्य अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. केवळ प्रभाग २७ मध्येच ही स्थिती नाही, तर विविध भागात दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी उपमहापौरांच्या प्रभागात अळ्यायुक्त पाणी आढळले होते. त्याबाबत वृत्त प्रसिध्द करूनही निर्ढावलेल्या प्रशासनाने उपाययाेजना केल्या नाहीत.
यापेक्षा ग्रामपंचायत बरी
नगर शहरातील ७५ टक्के भागात सध्या दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही महापालिकेची शोकांतिका आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता येत नसेल, तर आघाडीच्या सत्ताधार्‍यांनी महापालिका बरखास्त करून चक्क ग्रामपंचायत स्थापन करावी. पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरून स्टंटबाजी करण्यापेक्षा महापौरांनी नगरकरांना स्वच्छ पाणी कसे देता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे.''
अनिल राठोड, आमदार.
महापौरांना उशिरा आली जाग
सत्ताधारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेकडो नागरिकांना जलजन्य आजारांची लागण झाली. महापौर संग्राम जगताप यांनी तब्बल चार दिवसांनंतर परिस्थितीची पाहणी केली. त्यांना प्रत्येक ठिकाणी राजकारण दिसते. माजी महापौर शीला शिंदे यांनी पाठपुरावा करून बाधित नागरिकांना मोफत औषधवाटप केले. त्यानंतर जाग्या झालेल्या जगताप यांनी परिसराची पाहणी करून औषध वाटपाची मोहीम हाती घेतली.''
अनिल शिंदे, नगरसेवक

उंच टाक्यांच्या स्वच्छतेचे आदेश
शहरातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महापौर संग्राम जगताप यांनी उंच टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश दिले. शहरातील दहा उंच टाक्यांची स्वच्छता व सुरक्षा कशी रामभरोसे आहे, याबाबतचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने जून महनि्यातच प्रसिध्द केले होते. सत्ताधारी व प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेतली असती, तर जलजन्य आजारांची ही परिस्थिती निर्माण झाली नसती. आता तरी नगर शहरासह केडगाव उपनगरातील सर्व उंच टाक्यांची स्वच्छता करावी, अशी अपेक्षा नगरकर व्यक्त करत आहेत.