आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamasha Artist Gulabbai Sangamnerkar In Rajjo Hindi Film

वयाच्या 81 व्या वर्षी तमाशा कलावंत झळकणार हिंदी सिनेमात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - सतत 70 वर्षे लोककलेच्या क्षेत्रात स्वत:चा अमीट ठसा उमटवणार्‍या ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर वयाच्या 81 व्या वर्षी चित्रपटात चमकणार आहेत. त्यांच्या तीन पिढय़ांचा सुंदर मिलाफ या चित्रपटातून रसिकांना पहायला मिळणार आहे. चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांसोबतच्या त्यांच्या कामाची संगमनेकरांना उत्कंठा लागली आहे.

पानिपतकार विश्वास पाटील सध्या ‘रज्जो’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती करीत असून त्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. कथालेखक म्हणून परिचित असलेले पाटील आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत येत असून सध्या ते ‘रज्जो’च्या कामात व्यस्त आहेत. या चित्रपटात मूळच्या संगमनेरच्या आणि सध्या पुणेकर झालेल्या गुलाबबाई बडी अम्माची भूमिका साकारत आहेत. कोठय़ावर मुजरा सादर करणार्‍या रज्जो (कंगणा राणावत) हिच्यासोबत त्या कोठीच्या मालकिणीची भूमिका करत आहे. कंगणा राणावतसह पारस अरोरा, महेश मांजरेकर, प्रकाश राज, उपेंद्र लिमये आदी गाजलेले कलाकार या चित्रपटाच भूमिका करीत आहेत. मुंबईतील बोरीवली उपनगरात खासगी बंगल्यात कामाठीपुरा परिसराचा सेट उभारून चित्रपटाच्या महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले. 81 व्या वर्षी गुलाबबाई संगमनेरकर यांनी या चित्रपटात भूमिका स्वीकारली असून या बडी अम्माच्या भूमिकेला त्यांनी उत्तम न्याय दिला आहे. गुलाबबाईंच्या दृष्टीने चित्रपटातील भूमिका व अभिनय हा एक नवा अनुभव होता. जवळपास 70 वर्षे महाराष्ट्रातल्या रसिकांसमोर कला सादर करणार्‍या गुलाबबाईंना ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील चित्रपट रसिकांसमोर जाण्याची संधी मिळाली आहे. साहित्य, कला क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरच्या कला इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना म्हणून संगमनेरकरांना या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. पानिपतकार विश्वास पाटील आणि गुलाबबाई हे दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज ‘रज्जो’च्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

चित्रपटात तीन पिढय़ांचा संगम दिसणार
नवव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्‍या गुलाबबाई सध्या 81 वर्षांच्या आहेत. रज्जो चित्रपटाच्या माध्यमातून त्या पुन्हा आपल्यासमोर येणार असून या चित्रपटात त्यांच्या तीन पिढय़ांचा संगमही दिसणार आहे. त्यांची कन्या कल्पना पाटील आणि नात ढोलकीच्या तालावर फेम पियुषा एकत्र काम करीत आहेत. एकाच कुटुंबातील तीन पिढय़ांनी चित्रपटात एकत्रित काम करण्याचा प्रयोग रसिकांना बघायला मिळणार आहे. ’’ संतोष खेडलेकर, लोककला अभ्यासक.

त्यांची निवड सर्वार्थाने योग्य
तमाशा, संगीतबारीच्या माध्यमातून लोकरंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणार्‍या गुलाबबाईंखेरीज रज्जोतील बडी अम्मीच्या भूमिकेसाठी मी इतर कोणाचाही विचार करू शकलो नाही. 70 वर्षे रंगभूमीची सेवा करणार्‍या गुलाबबाईंनीही या वयात न कंटाळता, न थकता चित्रपटातील आपल्या भूमिकेला अतिशय उत्तम न्याय दिला आहे याचे समाधान वाटले.’’ विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपटाचे दिग्दर्शक.