आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tamasha Marketing On Social Networking, Latest News In Divya Marathi

Sunday SPL : सोशल नेटवर्किंगवरून आता तमाशाचे मार्केटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काळाचा महिमा ओळखून अनेकांनी बदल स्वीकारला. एकेकाळी राजार्शय लाभलेली तमाशा कलाही याला अपवाद राहिली नाही. इंटरनेटच्या या युगात तमाशा कलावंतांच्या दुसर्‍या पिढीने फेसबुक, व्हॉटस् अँप या सोशल नेटवर्किंगचा आधार घेत तमाशा कलेला पुन्हा एकदा ऊजिर्तावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
दत्ता महाडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, विठाबाई नारायणगावकर, तुकाराम खेडकर या जुन्या कलावंतांनी तमाशा गाजवला. या कलावंतांच्या दुसर्‍या पिढीने तमाशा कलेला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी त्यांनी सोशल नेटवर्किंगचा आधार घेतला आहे. त्यामुळे केवळ राज्यभरात मान्यता पावलेली ही कला आता थेट साता समुद्रापार पोहोचली आहे. आपल्या तमाशाची पार्श्वभूमी, तमाशा कलेची वैशिष्ट्ये, नावीन्यपूर्ण वगनाट्य, प्रमुख कलावंत, प्रयोगाचे ठिकाण व दिनांक, वेळ याची माहिती फेसबुकवरून रसिकांना थेट घरबसल्या मिळत आहे. या सोशल नेटवर्किंगवर तमाशाचा इतिहास, सुवर्णकाळ, गाजलेले कलावंत, तमाशाचा उदय याची माहितीही फेसबुकवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे कधी नव्हती ती तमाशा कला पुन्हा एकदा बहरात आली. तमाशा कलावंतांना मिळणारे पुरस्कार, त्यांचे वाढदिवस याची माहिती प्रेक्षकांना मिळू लागली. सोशल नेटवर्किंगवर तमाशाच्या पोस्टरला मिळणारे लाईक आणि कमेंटसवरून तमाशा कलेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तमाशा कलावंतांच्या गाडीवरही आता www.mangalabansode.co अशी संकेतस्थळे ठळकपणे झळकत आहेत.
कलावंतांसह लावणी नृत्यांगणांनीही सोशल मिडियाचा आधार घेतला. सीमा पोटे, सुवर्णा काळे, सुरेखा पुणेकर या लावणी नृत्यांगणा यात आघाडीवर आहेत. तमाशातील बतावणी, वगनाट्यातील संवादामध्येही सोशल नेटवर्किंगमधील शब्दांचा चपखलपणे वापर केला जात आहे. तमाशाची पंढरी समजल्या जाणार्‍या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे यात्रांसाठी तमाशाची बुकिंग सुरू आहे. बुकिंगसाठी उभारलेल्या राहुट्यांनाही आता हायटेक स्वरूप मिळाले आहे. ग्राहकांना आपल्या तमाशाची माहिती संगणक, तसेच लॅपटॉपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. काही तमाशा मालकांकडे खेळाची ऑनलाइन बुकिंग व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, तमाशा परदेशात